पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे शहर आणि परिसरात मंगळवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर बुधवारी सकाळी काही वेळ पाऊस पडला. त्यानंतर पावसाने उघडीप दिली आणि कडक ऊन पडले होते. असे असले तरी गुरुवारी (दि. 28) गणेश विसर्जन मिरवणुकीवर पावसाचे सावट राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेचे प्रमुख शास्त्रज्ञ अनुपम कश्यपि यांनी व्यक्त केला आहे.
पुणे शहर आणि परिसरात गेल्या तीन दिवसांपासून मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान मंगळवारी रात्री जोरदार पाऊस बरसण्यास सुरुवात झाली, अगदी मध्यरात्रीपर्यंत पावसाचा जोर कायम होता. पहाटेच्या दरम्यान पावसाने उघडीप दिली. पावसाने दाणादाण उडवून दिल्यामुळे गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांचा चांगलाच हिरमोड झाला.
दरम्यान बुधवारी सकाळपासूनच शहरावर ढगाळ वातावण राहिले होते. त्यानंतर सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस बरसण्यास सुरुवात झाली. सुमारे एक ते दीड तास पावसाने धुवावार बॅटिंग केली. त्यानंतर दुपारच्या दरम्यान ऊन पडले, तर संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. गुरुवारी शहरात गणेश विसर्जन असून, या विसर्जन मिरवणुकीवर पावसाचे सावट राहणार आहे. अशी माहिती कश्यपि यांनी दिली.
हेही वाचा