Pune Anant Chaturdashi 2023 : पुण्यातील मानाच्या, प्रमुख मंडळांच्या मिरवणूका निघणार वाजतगाजत

Pune Anant Chaturdashi 2023 : पुण्यातील मानाच्या, प्रमुख मंडळांच्या मिरवणूका निघणार वाजतगाजत

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सनई-चौघड्याच्या सुरावटीत…ढोल-ताशाच्या निनादात आणि 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'च्या जयघोषात गुरुवारी गणरायाला भावपूर्ण निरोप दिला जाणार आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीची तयारी झाली असून, मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांच्या वतीने खास देखणे रथ तयार करण्यात आले आहेत. रांगोळ्यांच्या मनोहारी पायघड्या, फुलांनी सजविलेल्या आकर्षक रथात विराजमान झालेले बाप्पा, ढोल-ताशांचा निनाद, बँड पथकांचे उत्कृष्ट वादन, जनजागृतीपर देखावे अशी पुण्याची देदीप्यमान मिरवणुकीची परंपरा यंदाही कायम राहणार आहे.

गुरुवारी अनंत चतुर्दशीला सकाळी दहा वाजता महात्मा फुले मंडई येथून वैभवशाली मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते लोकमान्य टिळक आणि यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीचा प्रारंभ होईल. चांदीच्या पालखीतून तसेच आकर्षक रथातून निघणार्‍या मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांच्या मिरवणुकामध्ये ढोल-ताशा पथके, बँड पथके, सनई-चौघडा आणि नगाराचा गाडा असणार आहे, तर मंडईपासून ते टिळक चौकापर्यंत राष्ट्रीय कला अकादमीचे स्वयंसेवक मनोहारी रांगोळ्याच्या पायघड्या घालणार आहेत.

मागील वर्षी विसर्जन मिरवणूक 36 तास लागले, मिरवणुकीला उशीर झाल्यामुळे यंदा मिरवणूक वेळेत संपविण्यावर मंडळांनी भर दिला आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट यंदा पहिल्यांदाच सायंकाळी चार वाजता लक्ष्मी रस्त्याने सहभागी होणार आहे, तर मानाच्या पाचही मंडळांनी मिरवणूक लवकर संपविण्यासाठी पुढाकार घेतला आहे, तर अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट या विसर्जन मिरवणुकीतील प्रमुख मानाच्या गणपती मंडळांसह हुतात्मा बाबू गेनू मंडळ ट्रस्ट आणि श्रीजिलब्या मारुती गणपती मंडळ ही प्रमुख मंडळे नेहमीप्रमाणे सायंकाळी सहानंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतील.

मिरवणुकीला उशीर होऊ नये यासाठी चार चौकांमध्ये दहा-दहा मिनिटे ढोल-ताशा पथकांचे वादन केले जाणार आहे, असे त्यांनी जाहीर केले आहे. तर लक्ष्मी रस्त्याने मानाचे पाच गणपती मार्गस्थ झाल्यानंतर अन्य मंडळांना जागा करन दिली जाईल. मिरवणुकीत मंडळांना सोडताना परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात येईल. मिरवणूक कमीत कमी वेळेत संपविण्यावर प्रयत्न करू, असे पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी सांगितले.

यंदा मंडळांसह घरगुती गणपतीच्या मूर्तींचे विसर्जन भाविकांना घाटांवर करता येईल. महापालिकेने घाटांवर तयार केलेले हौद, महापालिकेच्या फिरत्य हौदातही विसर्जन करता येणार आहे. गणेश मूर्तीदान करण्याची व्यवस्थाही पालिकेने केली आहे. लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्ता, टिळक चौक, शास्त्री रस्ता आदी ठिकाणी विविध मंडळांची मिरवणूक पाहायला मिळेल.

श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट, श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट, गुरुजी तालीम मंडळ, श्री तुळशीबाग गणपती मंडळ ट्रस्ट, केसरीवाडा गणपती या मानाच्या पाच गणपतींसह अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट या प्रमुख गणपती मंडळांची वैभवशाली मिरवणूक पुणेकरांना पाहता येणार आहे. एकूणच भावपूर्ण वातावरणात बाप्पाला गुरुवारी निरोप दिला जाणार आहे.

नऊ हजार पोलिस तैनात

तब्बल नऊ हजार पोलिसांचा खडा बंदोबस्त असणार.
एसआरपीएफच्या दोन तुकड्यांचा समावेश.
मिरवणुकीच्या मुख्य चारही मार्गांवर पोलिसांची 40 पथके तैनात असतील.
मुख्य मिरवणुकीच्या मार्गांवर मार्गदर्शनासाठी जागोजागी एलईडी स्क्रीन लावले आहेत.
आणीबाणीच्या परिस्थितीत रुग्णवाहिकेसाठी स्वतंत्र मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.
लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मदत केंद्रे उभारण्यात आली आहेत.
मुख्य मिरवणूक सकाळी दहा वाजता महात्मा फुले मंडई येथून सुरू होणार.
मिरवणुका वेळेत संपविण्याचे पोलिसांसमोर आवाहन.
मंडळांकडून मिरवणुकीचे ऑनलाइन प्रक्षेपण.
पोलिस, अग्निशामक दल, आरोग्य कर्मचारी सज्ज.
मिरवणुकीमुळे मुख्य भागातील वाहतूक मार्गात बदल.
गणरायाला निरोप देण्यासाठी वरुणराजाही हजेरी लावण्याची शक्यता.
विसर्जनासाठी 42 बांधीव हौद.
विसर्जनासाठी 150 फिरते हौद.
शहरात 265 ठिकाणी 568 लोखंडी टाक्या.
शहरात 1183 स्वच्छतागृहे.
400 फिरती स्वच्छतागृहे.
252 मूर्तिसंकलन आणि मूर्तिदान केंद्रे.
256 ठिकाणी निर्माल्य कलश.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news