पुणेकरांना अनुभवायला मिळणार वैभवशाली मिरवणूक; लाडक्या बाप्पांना आज निरोप | पुढारी

पुणेकरांना अनुभवायला मिळणार वैभवशाली मिरवणूक; लाडक्या बाप्पांना आज निरोप

पुणे; पुढारी वृत्तसेवा : दहा दिवस केलेली गणरायाची आराधना, रंगलेला उत्सवाचा रंग अन् बाप्पासाठी जागलेल्या रात्री आजपासून नसतील…कारण आपल्या लाडक्या बाप्पाला आपण आज भावपूर्ण निरोप देणार आहोत…चैतन्य, हर्षोल्हास अन् जीवनात आनंदाच रंग भरुन बाप्पा निरोप घेणार आहेत…आपण सगळेच त्यांना जड अंत:करणाने निरोप देणार असलो तरी पुढील वर्षी ते नक्कीच पुन्हा नक्की घरी येतील, ही आस आपल्या मनात असणारच आहे…

पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि संपूर्ण जिल्ह्यात दहा दिवस उत्साहपूर्ण आणि जल्लोषपूर्ण गणेशोत्सव साजरा झाल्यानंतर गुरुवारी (दि.28) लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जाणार आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या….गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला असे म्हणत प्रत्येक गणेशभक्त बाप्पाला निरोप देणार असून, पुढील वर्षी बाप्पा अशीच उर्जा आणि नवा प्रकाश, नवी उमेद आणि नवी उर्मी घेऊन लवकर यावेत, अशी प्रार्थनाही बाप्पाकडे केली जाईल. ढोल-ताशाच्या निनादात आणि सनई-नगाराच्या सुरावटीत मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांच्या वैभवशाली विसर्जन मिरवणुका आज निघणार आहेत तर घरगुती गणपतीलाही पुणेकर निरोप देणार आहेत.

मागील वर्षी निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा झाला. यंदाही मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. पहिल्याच दिवशी वाजतगाजत निघालेल्या मिरवणुकांनी प्रत्येकाचे लक्ष वेधले. दहाही दिवस पुणेकर गणेशोत्सवाच्या आनंदोत्सवात, जल्लोषात न्हाऊन गेले. दहाही दिवस बाप्पाची मनोभावे आराधना करण्यात आली आणि मंडळांनीही थाटात, आनंदात उत्सव साजरा केला. उत्सवात काही दिवस पाऊसही बरसला पण पुणेकरांच्या उत्साहात कोणतीही कमतरता नव्हती. भरपावसातही मंडळांचे देखावे पाहण्यासाठी मध्यवर्ती भागासह उपनगरात गर्दी पाहायला मिळाली. अलोट गर्दी आणि चैतन्याची पालवी शेवटच्या दिवशीही पाहायला मिळाली.

गणेशोत्सव चैतन्यात आणि हर्षोल्हासात साजरा झाल्यावर आज मंडळांच्या आणि घरगुती गणपतींच्या मूर्तींचे विसर्जन होणार आहे. मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांच्या वतीने खास उत्सवासाठी रथ तयार करण्यात आले आहेत. रांगोळ्यांच्या मनोहारी पायघड्या, फुलांनी सजविलेल्या आकर्षक रथात विराजमान झालेले बाप्पा, ढोल-ताशांचा निनाद, बँड पथकांचे उत्कृष्ट वादन, जनजागृतीपर देखावे अशी पुण्याची देदिप्यमान मिरवणुकीची परंपरा यंदाही कायम राहणार आहे.

गुरुवारी अनंत चतुर्दशीला सकाळी दहा वाजता महात्मा फुले मंडई येथून वैभवशाली मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते लोकमान्य टिळक आणि यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मिरवणुकीचा प्रारंभ होईल.

चांदीच्या पालखीतून तसेच आकर्षक रथातून निघणार्‍या मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांच्या मिरवणुकामध्ये ढोल-ताशा पथके, बँड पथके, सनई-चौघाडा आणि नगाराचा गाडा असणार आहे. तर मंडईपासून ते टिळक चौकापर्यंत राष्ट्रीय कला अकादमीचे स्वयंसेवक मनोहारी रांगोळ्याच्या पायघड्या घालणार आहेत. पुण्याची पारंपरिक मिरवणुकीचा वारसा यंदाही जपला जाणार आहे. पावसाच्या अंदाज वर्तविल्याने त्यादृष्टीनेही मंडळांनी विसर्जन मिरवणुकीची तयारी केली आहे.

मागील वर्षी विसर्जन मिरवणुक उशिरा संपली. मिरवणुकीला उशिर झाल्यामुळे यंदा मिरवणुक वेळेत संपविण्यावर मंडळांनी भर दिला आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट यंदा पहिल्यांदाच सायंकाळी चार वाजता लक्ष्मी रस्त्याने सहभागी होणार आहे. तर मानाच्या पाचही मंडळांनी मिरवणुक लवकर संपविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तर अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट या विसर्जन मिरवणुकीतील प्रमुख मानाच्या गणपती मंडळांसह हुतात्मा बाबू गेनू मंडळ ट्रस्ट आणि श्रीजिलब्या मारुती गणपती मंडळ ही प्रमुख मंडळे नेहमीप्रमाणे सायंकाळी सहानंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतील.

मिरवणुकीला उशिर होऊ नये यासाठी चार चौकांमध्ये दहा-दहा मिनिटे ढोल-ताशा पथकांचे वादन केले जाणार आहे, असे त्यांनी जाहीर केले आहे. तर लक्ष्मी रस्त्याने मानाचे पाच गणपती मार्गस्थ झाल्यानंतर अन्य मंडळांना जागा करुन दिली जाईल. मिरवणुकीत मंडळांना सोडताना परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात येईल. मिरवणुक कमीत कमी वेळेत संपविण्यावर प्रयत्न करु, असे पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी सांगितले आहे. काही मंडळांनी यंदा ढोल-ताशा पथकांच्या पारंपरिक वादनावर भर दिला आहे तर काही पथकांनी डीजे वाजविण्याला प्राधान्य दिले आहे.

यंदा मंडळांसह घरगुती गणपतीच्या मूर्तींचे विसर्जन भाविकांना घाटांवर करता येईल. महापालिकेने घाटांवर तयार केले हौद, महापालिकेचे फिरते हौदात विसर्जन करता येणार आहे. गणेश मूर्तीदान करण्याची व्यवस्थाही पालिकेने केली आहे. लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्ता, टिळक चौक, शास्त्री रस्ता आदी ठिकाणी विविध मंडळांची मिरवणूक पाहायला मिळेल.

ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त असणार आहे. श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट, श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट, गुरुजी तालीम मंडळ, श्री तुळशीबाग गणपती मंडळ ट्रस्ट, केसरीवाडा गणपती या मानाच्या पाच गणपतींसह अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट या प्रमुख गणपती मंडळांची वैभवशाली मिरवणुक पुणेकरांना पाहता येणार आहे. एकूणच भावपूर्ण वातावरणात बाप्पाला गुरुवारी निरोप दिला जाणार आहे.

बाप्पाचे विसर्जन गुरुवारीच करा

गुरुवारी (दि.28) अनंत चतुर्दशी सायंकाळी सूर्यास्तालाच संपते आणि शुक्रवारी (दि.29) पितृपंधरवडा सुरु होत आहे. भाद्रपद कृष्ण प्रतिपदेचे श्राद्ध शुक्रवारीच आहेत. यामुळे गणेशोत्सवातील श्रीगणेशाच्या मूर्तीचे विसर्जन गुरुवारीच सूर्यास्तापर्यंतच करावे आणि धर्म पाळावा, असे आवाहन शारदा ज्ञानपीठमचे संस्थापक पंडित वसंतराव गाडगीळ यांनी गणेशभक्तांना केले आहे. सर्वांनी विसर्जन मिरवणुकीची वेळ पाळावी, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा

Pune Ganeshotsav 2023 : खरंच यंदा वेळेत संपेल मिरवणूक?

Anant Chaturdashi : गणरायाला आज निरोप

मंत्रालय आजपासून पाच दिवस बंद

Back to top button