मुंबई-गोवा महामार्गाचे काम डिसेंबर पर्यंत पूर्ण होणार : नितीन गडकरी

मुंबई-गोवा महामार्गाचे काम डिसेंबर पर्यंत पूर्ण होणार : नितीन गडकरी
Published on
Updated on

पनवेल; पुढारी वृत्तसेवा : मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पनवेल ते इंदापूर दरम्यानच्या पहिल्या टप्प्याचे काम ज्या-ज्या कारणांनी रखडलेले आहे, त्यावर पुस्तक लिहिले जाऊ शकते. परंतु काहीही असले तरी मी या खात्याचा मंत्री म्हणून माफी मागतो. डिसेंबर 2023 पर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होईल, असे अश्वासन केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. पनवेल तालुक्यातील खारपाडा येथे आयोजित रस्त्यांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी मंत्री गडकरी म्हणाले की, भूसंपादन, परवानग्या, कंत्राटदारांच्या अडचणी यासारख्या समस्यांमुळे कोकण विभागातील अनेक कामांना अडचणी येत होत्या. मात्र आता भारत सरकारच्या केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने ही जबाबदारी स्वीकारली असल्याचे त्यांनी सांगितले. 1,200 कोटी रुपयांच्या कळंबोली जंक्शन आणि 1,146 कोटी रुपयांच्या पागोटे जंक्शनचे कामही लवकरच सुरू होईल असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी 13,000 कोटी रुपयांच्या मोरबे-करंजाडे रस्त्याच्या बांधकामाची देखील घोषणा केली. यामुळे मुंबई ते दिल्ली अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ 12 तासांपर्यंत कमी करेल.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनिल तटकरे, राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड-रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार रवींद्र पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी खासदार रामशेठ ठाकूर, प्रसिद्ध व्यावसायिक जे.एम.म्हात्रे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, मुंबई विभागाचे क्षेत्रीय अधिकारी अंशुमाली श्रीवास्तव, मुख्य अभियंता शेलार, पनवेल प्रांताधिकारी राहुल मुंडके, पेण प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, पनवेल तहसिलदार विजय तळेकर, पेण तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अंशुमाली श्रीवास्तव यांनी केले. तर आभार यशवंत घोटकर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल रेगे यांनी केले.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम यावर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. ज्यामुळे कोकण क्षेत्राच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. हा महामार्ग कोकणातील 66 पर्यटनस्थळांना स्पर्श करतो. त्यातून विकासाला मोठी चालना मिळेल. या महामार्गाचे काम पूर्ण होण्याने कोकणातील फळे आणि इतर उत्पादनांची जलद वाहतूक देखील होईल. त्यातून व्यवसायास चालना मिळेल. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने या कामासंबंधी 2011 मध्ये बांधकामासाठी दोन स्ट्रेच देण्यात आलेल्या संबंधित कंत्राटदारांना कामातील दिरंगाईसाठी जबाबदार धरले. आता सर्व प्रकरणे निकाली निघाली आहेत. आता महामार्गाचे 11 टप्प्यांत बांधकाम व रुंदीकरण करण्यात येणार आहे. जेएनपीटी आणि दिघी बंदर यांना जोडणारा महामार्ग देशाच्या प्रगतीला निश्चित हातभार लावेल, असा विश्वास मंत्री गडकरी यांनी व्यक्त केला.

414.68 कोटींच्या तीन प्रकल्पांच भूमीपूजन

केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते 414.68 कोटींच्या 63.900 किलोमीटर लांबीच्या तीन प्रकल्पांचे भूमीपूजन डिजिटल पद्धतीने संपन्न झाले. त्यानंतर या प्रकल्पाची सविस्तर माहिती देणारी ध्वनीचित्रफित सर्वांना दाखविण्यात आली. कोकणासाठी महत्वपूर्ण असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र.66 मुंबई ते गोवा या महामार्गावरील पनवेल ते कासू (लांबी 42.300 कि.मी. आणि मूल्य 251.96 कोटी) या रस्त्याचे काँक्रिटीकरण, राष्ट्रीय महामार्ग क्र.965 डीडी राजेवाडी फाटा ते वरंध गाव (लांबी 13 कि.मी. आणि मूल्य 126.73 कोटी) व राष्ट्रीय महामार्ग क्र.965 डीडी वरंध गाव ते पुणे जिल्हा हद्द (लांबी 8.60 कि.मी. आणि मूल्य 35.99 कोटी) या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासह दुपदरीकरण करणे, अशा एकूण 63.900 किलोमीटर लांबी व एकूण 414.68 कोटी मूल्य असलेल्या या तीन प्रकल्पांचा भूमीपूजन सोहळा खारपाडा, ता.पनवेल येथे संपन्न झाला.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news