नाशिक : कळवण बाजार समितीच्या निवडणुकीचे वातावरण तापले | पुढारी

नाशिक : कळवण बाजार समितीच्या निवडणुकीचे वातावरण तापले

नाशिक (कळवण) : बापू देवरे
कळवण बाजार समितीची ४०० कोटीची उलाढाल व ४ कोटीचे उत्पन्न असलेल्या कळवण बाजार समितीची निवडणुकीचे वातावरण तापले आहे. कोरोना कालावधीमुळे दोनवेळा संचालक मंडळाला मुदतवाढ मिळाल्यानंतर आणि वर्षभरापासून प्रशासक असलेल्या कळवण बाजार समितीच्या संचालक मंडळाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने तालुक्यातील गट-तट सज्ज झाले आहेत. सहविचार सभा आणि ग्रुप बैठकांमुळे निवडणुकीचे वातावरण तापले आहे. सर्व पक्षीय पॅनलही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने भर उन्हात निवडणुकीचे वातावरण तापले आहे.

एक दृष्टीक्षेप कळवण कृषी उत्पन बाजार समितीवर…
कळवण कृषी उत्पन बाजार समितीची स्थापना १९७१ साली झाली असली तरी प्रत्यक्षात कामकाज १९७५ पासून सुरु होऊन २००४ साली कळवण- देवळा बाजार समितीचे विभाजन होऊन खऱ्या अर्थाने कळवण बाजार समिती अस्तित्वात आली आहे. स्वतंत्र बाजार समितीचे लोकनियुक्त संचालक मंडळ २००८ साली अस्तित्वात येउन बाजार समितीची विकासकडे वाटचाल सुरु झाली. त्यापूर्वी मुलभूत सुविधा पासून बाजार समिती वंचित होती. १ मार्च १९७१ सटाणा बाजार समिती म्हणून कळवण बाजार समिती उदयास आली. परंतु १९७५ साली कळवण- देवळा हि एकत्रित बाजार समिती प्रत्यक्षात अस्तित्वात येउन कळवण येथून बाजार समितीचा कामकाजास सुरुवात झाली,. कळवण – देवळा तालुक्याचे विभाजन झाल्यांनतर काही वर्षात म्हणजे २००४ साली कळवण व देवळा ह्या स्वतंत्र बाजार समिती सुरु झाल्या. २००४ पासून २००८ पर्यंत बाजार समितीवर शासन नियुक्त प्रशासकीय मंडळ कार्यान्वित होते. या प्रशासकीय मंडळ नियुक्तीवरून कळवण तालुक्याच्या राजकारणाची दिशा बदलली गेली. २००८ साली बाजार समितीची सार्वत्रिक निवडणूक होऊन जि. प. सदस्य रवींद्र देवरे व जिल्हा बँक संचालक धनंजय पवार यांचे नेतृत्वाखालील पॅनल सत्तेवर आले. तर व्यापारी गटातील दोन उमेदवार विरोधी गटाकडून निवडून आले. परंतु प्रभावी विरोधक नसल्याने धनंजय पवार यांची एकहाती सत्ता बाजार समितीवर आली व विभाजन झाल्यानंतर पहिलेच लोकनियुक्त संचालक मंडळ कार्यांन्वित झाले व येथूनच बाजार समितीची विकासाकडे घोडदौड सुरु झाली. गेली १४ वर्षात बाजार समितीचा कायापालट झालेला बघावयास मिळत आहे.

राजकीयदृष्ट्या एक नजर…
येथील बाजार समितीवर अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव राहिला आहे. या निवडणुकीत कळवण बाजार समितीचे माजी सभापती धनंजय पवार यांच्या पॅनलविरोधात एकेकाळचे सहकारी मविप्रचे संचालक रवींद्र देवरे यांचे पॅनल आमने-सामने उभे ठाकणार आहे. मविप्रनंतर पुन्हा बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने धनंजय पवार रवींद्र देवरे हे तालुक्यातील दोन मातब्बर नेते आमने सामने लढणार असून, निवडणुकीत उमेदवारीदेखील करणार असल्यामुळे सामना रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे मविप्र निवडणुकीत रवींद्र देवरे यांनी धनंजय पवारांवर मात केली. त्यामुळे या निवडणुकीत पुन्हा अस्तित्वाची लढाई होणार असून,माजी आमदार जे पी गावित यांच्या नेतुत्वाखाली पॅनल केला जाणार असल्याची चर्चा आहे. सर्वपक्षीय पॅनल झाला तर कोणत्या पॅनल फटका बसेल येणाऱ्या काळात समजेल तर बोटावर मोजण्या इतक्या लोकांनी तिसरा पॅनल निर्मिती करण्याची सुपारी घेतली आहे. अशी मतदार संघात चर्चा आहे. त्यामुळे मताचे विभाजन होणार आहे. म्हणूच धनंजय पवार हे सत्ता राखण्यासाठी तर रवींद्र देवरे हे सत्ते परिवर्तन करण्यासाठी आक्रमक झाले आहेत. गेल्या ३ ते ४ महिन्यांपासून बाजार समिती निवडणुकीच्या निमित्याने तालुक्यात सहविचार सभा बैठका घेऊन आरोप प्रत्यारोप सुरु झाले.  दोन्ही नेत्यांनी हि निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. या निवडणुकीत केंदीय राज्यमंत्री डॉ भारती पवार, आमदार नितीन पवार ,माजी आमदार जे पी गावित यांची भूमिका देखील महत्वाची ठरणार आहे.

बाजार समितीचा विकास आणि उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न केले. दरवर्षी उत्पन्नाचा आलेख हा वाढता असून, कळवण मुख्य कार्यालय आवार व नाकोडा, अभोणा उपआवारात कोट्यवधी रुपयाची विकासकामे केली. ३-४ कोटी रुपये समितीकडे शिल्लक आहेत. बाजार समितीच्या इतिहासात १४ वर्षांच्या कारकिर्दीत विकासकामे झाल्याचे समाधान आहे.         – धनंजय पवार, माजी सभापती.

बाजार समिती म्हणजे असुविधांचे केंद्र…
गेल्या पंचवार्षिकमध्ये सत्ताधारी गटातील शीतलकुमार अहिरे यांचा अपवाद वगळता इतर संचालकांना उपसभापती पदावर संधी मिळाली. कळवण बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपूनही कोरोना महामारीमुळे दोनवेळा मुदतवाढ मिळाली आहे. धनंजय पवार हे २००८ पासून सभापती पदावर होते. त्यामुळेच शेतकऱ्यांची व मतदारांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या १४ वर्षापासून बाजार समितीची सत्ता उपभोगणाऱ्या नेत्यांनी शेतकरी हिताचा कुठलाच विचार न केल्यामुळे हि बाजार समिती शेतकऱ्यांची आहे की नेत्यांची असा प्रश्न निर्माण होत असून बाजार समितीचा कुठलाही निर्णय हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने हिताचा ठरलेला नाही. शेतकऱ्यांना मुबलक सुविधा पुरवणे दूरच राहिले असून बाजार समिती म्हणजे असुविधांचे केंद्र बनले आहे. कळवण बाजार समितीच्या गलथान कारभारामुळे आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकरी वणी, लासलगाव येथील बाजार समितीत आपला माल विक्रीस नेतात. मालाला योग्य भाव मिळावा. यासाठी शेतकरी लांबचा प्रवास करतात. मात्र रस्त्यांची दुरावस्थेमुळे प्रवासात वारंवार होणा-या अपघातांमध्ये शेतकऱ्यांचे बळी गेले आहेत. तर अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. त्यामुळे कळवण बाजार समितीत योग्य सुविधा आणि शेतमालाला योग्य भाव मिळाला असता तर शेतकऱ्यांनी दुस-या बाजार समितीत माल विक्रीस नेला असता. पर्यायाने बाजार समितीचे उत्पन्नही वाढले असते आणि बाजार समितीला त्याचा आर्थिक लाभही झाला असता. मात्र तसे न करता सत्तेत मश्गुल असणाऱ्या सत्ताधा-यांनी आर्थिक लाभाचा विचार केल्याने बाजार समितीतील सध्याच्या कारभाऱ्यांवर शेतकऱ्यांचा विश्वासच राहिला नसल्याचे शेतकरी वर्गाकडून बोलले जात आहेत.

दृष्टिक्षेपात मतदारसंख्या, ग्रामपंचायत गट ७७३ सोसायटी गट ४९९ , व्यापारी गट ४०६ , हमाल मापारी गट ११२ एकूण मतदार १७९०  आहेत.

कळवण बाजार समितीचे मुख्य आवार, उपआवारात झालेली विकासकामे ही शेतकरी हिताची कमतरता दिसून येते. ठेकेदार हिताचे सर्व निर्णय घेतले जातात. चुकीच्या कार्यपद्धतीने प्रचिती झालेली आहे. शेतक-यांना पाहिजे त्या सोयी-सुविधा पुरविण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश आले. त्यामुळे शेतक-यांमध्ये नाराजी आहे. –  मोहन जाधव, माजी संचालक.

हेही वाचा:

Back to top button