“प्रामाणिक कार्यकर्ता गमावला”; गिरीश बापट यांच्या निधानानंतर मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या भावना! | पुढारी

“प्रामाणिक कार्यकर्ता गमावला”; गिरीश बापट यांच्या निधानानंतर मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या भावना!

पुढारी ऑनलाईन : भाजप खासदार गिरीश बापट यांचं काही वेळापूर्वीच पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात निधन झालं. बापट यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. भाजपमधील एक मुरब्बी राजकारणी अशी त्यांची ओळख होती. त्यांचा पुण्यातला जनसंपर्क हा प्रचंड मोठा होता. सर्व पक्षातील नेत्यांशी गिरीश बापट यांचे चांगले संबंध होते. आता त्यांच्या जाण्याने भाजपचा पुण्यातला मोठा आधार गेला आहे असं म्हटलं तरीही काहीही वावगं ठरणार नाही. भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी नगरसेवक ते खासदार अशी पदं सांभाळली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बापट यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ही अतिशय दुख:द बातमी आहे. आज आपण एक सच्चा, प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्ता गमावला आहे. दुर्धर आजाराशी झुंजत असताना देखील खासदार गिरीश बापट हे कायम पक्षाला ऊर्जा देण्याचे काम करत होते. त्यांच्याशी भेट व्हायची, तेव्हा केवळ राजकारणातली नव्हे तर अनेक विषयांवर त्यांना असलेली माहिती पाहून चकित व्हायचो. नुकतीच पुण्यात त्यांच्या तब्येतेची विचारपूस करण्यासाठी भेटही झाली होती. बापट यांनी त्यांची राजकीय कारकीर्द अगदी नगरसेवकापासून सुरू केली होती. आमदार, खासदार आणि मंत्री म्हणून त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम पुढाकार घेतला. पालकमंत्री म्हणून पुण्याच्या विकासाच्या दृष्टीने त्यांनी पाऊले उचलली होती, असं देखील एकनाथ शिंदे म्हटले.

Back to top button