“सरकारचा एककल्ली कारभार” ; अधिवेशनाच्या अखेरीस अजित पवार संतापले | पुढारी

"सरकारचा एककल्ली कारभार" ; अधिवेशनाच्या अखेरीस अजित पवार संतापले

पुढारी ऑनलाईन डेस्क : सरकार सकारात्मक काहीच बोलत नाही, निर्णय घेत नाही. विधानसभेचे अध्यक्षपण निर्णय द्यायाला तयार नाहीत, सरकारचा हा एककल्ली कारभार चालला आहे. त्याचा महाविकास आघडीकडून निषेध केला जात आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. विधानभवन परिसरात राष्ट्रीय नेत्यांचा अपमान करणाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली. पण याबाबत विधानसभा अध्यक्ष निर्णय जाहीर करत नसल्याने त्यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सभात्याग केली.

विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. सरकारकडून सकारात्मक निर्णय घेतले जात नसल्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभागृह सोडले. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पावर म्हणाले की, आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. महाविकास आघाडीने पहिल्या दिवसापासून कामकाजात भाग घेतला. विविध प्रश्नांना न्याय कसा मिळेल, यासाठी प्रयत्न केला. पण दोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय नेत्यांच्या फोटोला जोडे मारण्याची घटना घडली. जोडे मारण्याची कृती ज्या सदस्यांनी केली त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते आणि वेगळ्या प्रकारचा अंकुश सदस्यांवर राहील, अशी अपेक्षा होती. आम्ही हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला, मात्र विधानसभा अध्यक्षांचा कल असा दिसला की, दिवसाच्या शेवटी याप्रकरणी निकाल द्यायचा. हे आम्हाला अजिबात मान्य नाही ते आताच सांगितले पाहिजे या भूमिकेवर आम्ही ठाम राहिलो. मात्र अध्यक्ष निर्णय जाहीर करत नसल्याने सभात्याग केला.

राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याच्या घटनेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांची गटनेते व विरोधी पक्षनेते म्हणून भेट घेतली. त्यावेळी कुठल्याच राष्ट्रीय नेत्यांच्या बाबतीत अशी घटना घडता कामा नये. असे कोण करत असेल तर त्यांना निलंबित केले पाहिजे. शिवाय सभागृहात आमच्याकडून कुणी अपशब्द वापरले असतील तर त्यांच्यावरही कारवाई करा अशी भूमिका मांडली. ही माहिती त्यांनी ऐकून घेतली आणि आज सकाळी अधिवेशन सुरू होताच निर्णय घेतो, असे आश्वासन दिले असेही अजित पवार म्हणाले.

Back to top button