

बारामती : पुढारी वृत्तसेवा : गेल्या दोन वर्षांत महावितरणच्या बारामती परिमंडलाने शेतीपंपांच्या वीजजोडण्या देण्यात आघाडी घेतली आहे. एकूण 61 हजार 794 वीजजोडण्या देण्याचे काम केले आहे. 30 मीटर अंतरातील प्रतीक्षा यादी संपली आहे. त्यामुळे अस्तित्वात असलेल्या वीजयंत्रणेपासून जोडणीचे ठिकाण 30 मीटरपर्यंत असलेल्या शेतकर्यांनी तातडीने अर्ज करून कोटेशन भरावे. अशा सर्व शेतकर्यांना 31 मार्चच्या आत कनेक्शन देण्याचे निर्देश मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी परिमंडलातील अभियंत्यांना दिले आहेत.
शेतीपंपांच्या जोडणीकरिता एप्रिल 2018 पासून मार्च 2022 पर्यंत 69 हजार 983 शेतकर्यांनी अर्ज केले होते. या जोडण्या देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मकृषी धोरण 2020फ आणले. या धोरणानुसार दोन वर्षांत जी वसुली झाली, त्यातील 33 टक्के मकृषी आकस्मिक निधीफ गावपातळीवर व 33 टक्के निधी जिल्हापातळीवर उपलब्ध झाला. त्यातून प्रलंबित जोडण्या देणे व वीज यंत्रणा सक्षमीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले.
अंतरानुसार प्रलंबित जोडण्यांची संख्या पाहिली असता 30 मीटरच्या आतील 50 हजार 313 जोडण्यांपैकी 50 हजार 89 जोडण्या आज रोजी दिल्या आहेत. 31 ते 200 मीटर अंतरातील 12 हजार 160 पैकी 9262, तर 201 ते 600 मीटरपर्यंतच्या 7510 पैकी 2324 जोडण्या दिल्या आहेत. याशिवाय 600 मीटरपेक्षा जास्त अंतर असलेल्या 119 शेतकर्यांना सौरपंपाद्वारे वीजजोडणी देण्याचे काम महावितरण बारामती परिमंडलाने केले आहे. तसेच, उर्वरित जोडण्या देण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे.
नजीकच्या शाखा कार्यालयात संपर्क साधावा
ज्या शेतकर्यांची 30 मीटर अंतरातील जोडणी प्रलंबित आहे किंवा ज्यांना नव्याने अर्ज करायचा असेल, त्यांनी नजीकच्या महावितरण शाखा कार्यालयाशी संपर्क साधावा. या सर्व शेतकर्यांना तातडीने नवीन जोडण्या देण्यात येतील, असे पावडे यांनी सांगितले.
24 वीज उपकेंद्रांचे काम प्रगतिपथावर
कृषी आकस्मिक निधीतून बारामती परिमंडलात सद्य:स्थितीत 24 वीज उपकेंद्रांचे काम हाती घेण्यात आले आहे. 39 उपकेंद्रांतील अति उच्च दाब रोहित्राची क्षमतावाढ केली आहे. परिणामी, महावितरणची भारक्षमता वाढल्याने शेतकर्यांना अखंडित वीजपुरवठा करणे व नवीन जोडण्या देणे शक्य झाले आहे.