Parent Mistakes : पालकांनो! मुलांना चुकून देखील ‘ही’ वाक्ये बोलू नका; मानसिकतेवर होईल वाईट परिणाम | पुढारी

Parent Mistakes : पालकांनो! मुलांना चुकून देखील 'ही' वाक्ये बोलू नका; मानसिकतेवर होईल वाईट परिणाम

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुलांना चांगले पालकत्व देण्यासाठी आई-वडील नेहमीच धडपडतात, अफाट कष्ट घेत असतात. परंतु कधीतरी रागाच्या भरात किंवा अजानतेपणामुळे पालक (Parent Mistakes) अशी ‘काही’ वाक्य किंवा गोष्टी बोलतात, जे मुलांना बोलायला नको पाहिजेत. कारण अशी काही वाक्ये किंवा गोष्टी आपल्या मुलांना बोलल्याने याचा थेट परिणाम मुलांच्या जडणघडण आणि मानसिक आरोग्यावर होतो.

मुलांचे मन हे खूपच नाजूक आणि कोमल असते. एखाद्या वाक्याचा किंवा गोष्टीचा चटकण परिणाम त्यांच्या मनावर होतो आणि त्याचा ते नेहमी नेहमी विचार करू लागतात. अशातच पालकांनी बोललेले एखादे कठोर वाक्य किंवा गोष्ट मुलांच्या अंतर्मनाला वेदना पोहोचवते. याचा परिणाम म्हणजे यामुळे मुलांच्यातील आत्मविश्वास कमी किंवा पूर्णत: नष्ट होऊ शकतो. म्हणून लहान मुलांसमोर बोलताना जपून बोलले पाहिजे, असा सल्ला अनेक ज्येष्ठांकडून दिला जातो. चला तर जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत की, पालकांनी आपल्या मुलांच्या समोर चुकून देखील (Parent Mistakes) बोलू नयेत.

Parent Mistakes : ‘तू मुलगा’-‘तू मुलगी’ आहेस असा भेदभाव

तुमचे मुल मुलगा किंवा मुलगी असली तरी, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला कोणत्याही लिंगामध्ये पालकांनी कैद करण्याचा प्रयत्न करू नये. मुलगा जरी मोठा असेल तर तो देखील तुमच्यासाठी ब्रेकफास्ट बनवू शकतो आणि मुलगी देखील तुम्हाला फिरायला घेऊन जाऊ शकते. समजातील काही लोकांनी बनवलेल्या लिंग भेदभावाच्या नियमांमुळे तुमच्या मुलांमध्ये मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करू नका. यामुळे तुमच्या मुलांचे मन प्रभावित होऊ शकते आणि यामुळे त्याचा आत्मविश्वास कमी होतो. दैनंदिन जीवनात मुलं रडत नसतात, मुली शिकून काय करणार? शेवटी भाकरीच करायची आहे,  यांसारख्या गोष्टी पालकांकडून नेहमी ऐकवल्या (Parent Mistakes) जातात. यामुळे तुमच्या मुलामधील आत्मविश्वास कमी होऊ शकतो.

‘मला तुझ्याशी बोलायचे नाही’ किंवा ‘तू माझ्याशी बोलू नको’

पालकांनी आपण आणि आपल्या मुलांच्यातील बोलण्याचा किंवा चर्चा करण्याचा मार्ग कधीच बंद करू नये. आपल्या मुलांना नेहमी विचार शेअर करण्याचा आणि प्रश्न विचारण्याचा हक्क द्यावा, असे केल्याने तुमचे मुल त्याच्या मनातील सर्व विचार तुमच्याशी मुक्तपणे शेअर करेल. जर पालकांनी नाराज होऊन मुलांशी बोलणे बंद केले, तर त्यांच्या मनातील गोष्टी, विचार किंवा शंका या मुलांच्या मनातच राहतील. पुढे जाऊन याचा मुल आणि पालक यांच्या नात्यावर विपरित परिणाम होऊन दरी निर्माण होऊ (Parenting Mistakes) शकते.

‘मला तुझी लाज वाटते’

मुलांच्या वारंवार होणाऱ्या चुका किंवा वागण्यावर पालक नाराज होतात. शेजारी किंवा पाहुण्याच्या आपल्या मुलाला काहीतरी म्हणण्याने  ‘मला तुझी लाज वाटते’ असे वारंवार पालकांकडून मुलांना म्हटले जाते. अशी वाक्ये आई वडिलांकडून मुलांना पुन्हा पुन्हा म्हटल्याने त्याच्या मन आणि मानसिकतेवर याचा परिणाम होतो. तुमचे मुल त्याच्या नजरेत स्वत:ला कमी समजू लागते. मुलांना वारंवार ‘मला तुझी लाज वाटते’ असे म्हटल्याने मुलांचा आत्मविश्वास देखील कमी होतो.

तुम्‍ही आमच्यावरील ओझे आहात…

पालकांना मुलांना वाढवितांना अनेक आव्‍हानांना तोंड द्‍यावे लागते. यातूनच तणाव निर्माण होतो. कधीकधी विविध समस्‍यांमुळे अगतिक झालेले पालक मुलांना वाटेल तसे बोलतात. पालकांना राग आला की, तो मुलांवर काढला जातो. यातून मुलांना ‘तुम्‍ही आमच्‍यावरील ओझे आहात’, असे म्‍हटले जाते. मात्र याचा खोलवर परिणाम मुलांवर होतो. तो पालकांपासून दुरावला जातो. पुढे काही वर्षांनंतर तुमची मुलं नेहमी याच वाक्‍याची तुम्‍हाला आठवण करुन देत तुम्‍हाला दोष देतात.

घरातून बाहेर काढेन

काही पालक हे मुलांना नेहमी चांगले वागण्‍याची सूचना देत असतात. तसेच काही खोड्या केल्‍या तर घरातून बाहेर काढेन, असेही सुनावत असतात. मात्र मुले सुधारण्‍यासाठी दिलेली सूचनाच घातक ठरते. या मुलांना कधीच घरातून बाहेर काढेन असे म्‍हणू नका, या वाक्‍यामुळे पालक आणि मुलांमध्‍ये मोठी दरी निर्माण होते. अशी वाक्‍य मुलांच्‍या जिव्‍हारी लागतात. त्‍याच्‍या मानसिकतेवर दुष्‍परिणाम हाेताे.

मुलांना ‘नाकर्ते’ म्‍हणू नका

मुलांना बर्‍याच शब्‍दांचा अर्थ माहित नसतो. त्‍यामुळे पालकांनी जर चुकीचा शब्‍द वापरला तर मुले या शब्‍दांचा अर्थ शोधतात. त्‍यामुळे मुलांना कधीच तू नालायक आहेस, तू काहीच करु शकणार नाही, असे शब्‍द प्रयोग करु नका. पालकांनी उच्‍चारलेला चुकीचा शब्‍द हा मुलांचा आत्‍मविश्‍वास कमी करताेच त्‍याचबराेबर त्‍याचा पालकांवरील विश्‍वासही कमी हाेताे.

वारंवार टोमणे मारणे

पालकांनी मुलांशी कधीच टोमणे मारत बोलू नये. वारंवार मुलाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून टोमणे मारण्याने मुले चिडचिडी होतात आणि हट्टी बनतात. त्यामुळे मुलांशी सहज बोलताना देखील टोमणे मारू नका. कारण असे केल्याने तुमच्या मुलाच्या मनात तुमच्याविषयी तिरस्कार निर्माण होऊ शकतो.

हेही वाचा:

Back to top button