Parenting Tips : मुलांच्या चांगल्या जडणघडणीसाठी पालकांनी 'या' गोष्टी कटाक्षाने टाळाव्या | पुढारी

Parenting Tips : मुलांच्या चांगल्या जडणघडणीसाठी पालकांनी 'या' गोष्टी कटाक्षाने टाळाव्या

पुढारी ऑनलाइन डेस्क : Parenting Tips : पालक म्हणून आई वडिलांची जबाबदारी कधीही संपत नाही. पालकत्व आनंददायी होण्यासाठी मुलांशी ताळमेळ असणे अत्यंत आवश्यक आहे. मुलांशी पालकांची वर्तणूक, संवाद विचारपूर्वक असला तर मुलांवर होणारे नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी मदत होते. मुलांशी संवाद साधताना काही गोष्टी या हमखास टाळल्या पाहिजेत, असे तज्ज्ञांचे मत आहे. या सहा गोष्टी कोणत्या ते आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

१. वयावरून टोमणे मारू नका

काही वेळा बोलण्याच्या ओघात मुलांचे वय आपण विसरून जातो आणि ते लहान आहेत यावरूनच टीकटिप्पणी केली जाते. मुलांचे वर्तन हे त्याच्या वयाला अनुसरून असते. तू असे का बोलतोस? तुझं वागणं असे विचित्र का आहे? अशा प्रकारची टिप्पणी मुलांबद्दल करू नये. Parenting Tips

२. मुलांना वाढवावे लागते, याची तक्रार करणे

लहान मुलांना वाढवताना आपली धावपळ आणि दगदग होत असते. पण मुलांना वाढवताना आपल्याला त्रास होतो, याची जाणीव मुलांना करून देऊ नये. अशा प्रकारे तक्रार मुलांसमोर करत बसला तर याचा नकारात्मक परिणाम मुलांच्या स्वभावावर होतो. “तुला वाढवण्यात माझा फार वेळ जातो, यापेक्षा मी दुसरं काम केले असते,” “तुझ्या मागे माझा फार वेळ जातो,” अशा तक्रारी केल्याने सर्व समस्यांचे कारण आपणच आहोत, असे मुलांना वाटू लागते. Parenting Tips

३. अनावश्यक तुलना नकोच

मुलांची तुलना करणे हे फार विखारी असते. सतत तुलना करून आपण मुलांमध्ये न्यूनगंड तयार करतो आणि मुलं आत्मविश्वास गमावून बसतात तसेच आपलं काही मूल्य नाही असेही त्यांना वाटू लागते. भावंडांत तुलना होऊ लागली तर त्यांचे नाते कायमचे बिघडून जाते. त्यामुळे आपल्या मुलांची इतरांशी तुलना करणे नक्कीच टाळले पाहिजे. Parenting Tips

४. शारीरिक व्यंग, ठेवण यावर टीक नकोच नको

प्रत्येक मुलाची शारीरिक ठेवण ही वेगळी असते, त्यामुळे उंची, रंग, केसांची ठेवण, चेहरेपट्टी, उंची, वजन यावरून कोणतीही टीकाटिप्पणी, शेरेबाजी टाळावी. आपल्या शारीरिक ठेवणीत काही तरी उणिव आहे, असे मुलांना भासवू नये. याचा मुलांच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम होतो. Parenting Tips

५. पोकळ आश्वासनं नको

पूर्ण होऊ शकणार नाहीत, अशी आश्वासनं मुलांना देऊ नका. सतत असे झाले तर मुलांत आणि पालकांत अंतर पडू लागते, तसेच मुलांचा पालकांवरील विश्वासही कमी होऊ लागतो.

६. कठोर शब्दांचा वापर करू नका

बऱ्याच वेळा पालक रागाच्या भरात मुलांना उद्देशून कठोर शब्दांचा वापर करतात आणि शिवीगाळही करतात. यामुळे मुलं आत्मविश्वास गमावून बसतात. मुलांशी संवाद साधताना आपण कोणती भाषा वापरतो, याबद्दल पालकांनी सतर्क असले पाहिजे. Parenting Tips

हे ही वाचा :

Parenting Tips : पालकांनी जपून बोलावे, ‘या’ वाक्‍यांचा मुलांच्‍या मनावर होतो खोलवर परिणाम

Life Style Parenting : तुमची मुलं खूप हट्टी व चंचल आहेत का? मग ‘हा’ उपाय करून पाहा

Back to top button