नाशिक : नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना भरपाई देणार - मुख्यमंत्री शिंदे | पुढारी

नाशिक : नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना भरपाई देणार - मुख्यमंत्री शिंदे

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
हे सरकार शेतकर्‍यांचे, सर्वसामान्यांचे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांवर चालणारे असल्याने शेतकर्‍यांनी घाबरून जाऊ नये. अवकाळीने झालेल्या नुकसानीची भरपाई शासन देईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना आधार दिला.

स्व. गोपीनाथ मुंडे स्मारक लोकार्पणाचा कार्यक्रम सुरू असतानाच पाऊस सुरू झाल्यानंतर त्यांनी हा दिलासा दिला. राज्याच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेवून योजना आखल्या आहेत. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजने अंतर्गत भरघोस तरतूद केल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले. दरम्यान, माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी भाषणात, स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाची 2014 साली घोषणा झाली होती. मात्र आजपर्यंत स्मारक झाले नाही. शिंदे साहेब, स्मारक करूच नका. पण, ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी प्रमुख शहरांमध्ये वसतिगृह आणि हॉस्पिटल उभारा अशी मागणी केली. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी प्रमुख शहरांमध्ये वसतिगृह, हॉस्पिटल उभारण्यात येतील आणि स्मारकही होईल, असे आश्वस्त केले. ऊसतोड कामगार महामंडळास निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे आश्वासन देऊन गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतींना अभिवादन केले.

’राज्याच्या विकासावरचे मळभ दूर करण्यासाठी युतीचे सरकार’
महाराष्ट्राच्या विकासावर आलेले मळभ दूर करण्यासाठी भाजप-सेना युतीचे सरकार आणले असल्याचा उल्लेख मुख्यमंत्री शिंदे यांनी केला. काळाची, देशाची, राज्याची गरज ओळखून स्थापन केलेले हे सरकार असल्याचेही ते म्हणाले.

हेही वाचा:

Back to top button