रत्नागिरी : मुख्यमंत्री शिंदे यांच्या आजच्या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष | पुढारी

रत्नागिरी : मुख्यमंत्री शिंदे यांच्या आजच्या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

खेड : पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा दि. 19 रोजी शहरातील महाड नाका येथील एसटी मैदानात सांय. 5 वा. होणार आहे. या सभेची जय्यत तयारी शिंदे गटाकडून शिवसेना नेते रामदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार योगेश कदम तसेच हजारो शिवसैनिकांनी केली आहे. यावेळी शिंदे गटाचे जोरदार शक्तिप्रदर्शन होणार असून संपूर्ण राज्याचे लक्ष या सभेकडे लागले आहे.

खेड शहरातील महाड नाका येथील एसटीच्या मैदानात दि. 5 रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाल्यानंतर त्या सभेला शिवसेनेकडून जशास तसे उत्तर देण्याचा निर्धार शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला होता. त्यानंतर लगेचच खेड, दापोली, मंडणगडसह संपूर्ण कोकणातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दि. 19 रोजी सभा घेऊन शक्तिप्रदर्शन करण्याची जोरदार तयारी केली आहे.

तालुक्यातील ग्रामीण भागात शिवसेनेचे भगवे झेंडे, पताका, बॅनर, कटआऊट लावण्यात आले असून सभेला येणार्‍या शिवसैनिकांच्या सोयी-सुविधांसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. सभेला होणार्‍या गर्दीचा अंदाज घेऊन चारचाकी वाहनांसाठी व दुचाकी वाहनांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.

हजारो कार्यकर्ते या सभेमध्ये सहभागी होऊन मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांचे मार्गदर्शन ऐकू शकतील, असे नियोजन स्थानिक पदाधिकार्‍यांनी केले आहे. दापोली विधानसभा क्षेत्रामध्ये भगवा झंझावात अनुभवायला मिळावा, यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा पक्ष चिन्ह व शिवसेना नावाच्या पट्ट्या लावण्यात आल्या आहेत. भगवे झेंड, भगवे पट्टे कार्यकर्त्यांमध्ये वाटप करण्यात आले आहेत. अंतर्गत रस्त्यांवरही मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे फलक झळकत आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर भरणे नाका ते खेड शहरातून दापोलीच्या दिशेने जाणार्‍या मुख्य मार्गावर अनेक ठिकाणी भव्य स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत.

शहरासह ग्रामीण भागात वाहनांवर ध्वनिक्षेपक लावून रविवारी होणार्‍या जाहीर सभेचे निमंत्रण जनतेला देण्यात आले आहे. या सभेला विक्रमी गर्दी होण्याच्या शक्यतेने स्थानिक पोलिस प्रशासनाने जादा कुमक मागवून घेतली आहे. वाहतुकीचे योग्य नियमन करता यावे यासाठी सतत बैठका पोलिस प्रशासनाकडून सुरू आहेत. जागोजागी वाहनतळ, सभेच्या ठिकाणी जाण्यासाठी वाहनांना मार्गदर्शक सूचनाफलक लावण्यात आले आहेत. सभा यशस्वी होण्यासाठी शिवसेना नेते रामदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार योगेश कदम, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, तालुकाप्रमुख सचिन धाडवे प्रयत्नशील आहेत.

Back to top button