नाशिक : डाकसेवकांचा देशव्यापी संप स्थगित | पुढारी

नाशिक : डाकसेवकांचा देशव्यापी संप स्थगित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांपाठोपाठ ऑल इंडिया ग्रामीण डाकसेवक युनियन आणि नॅशनल युनियन ग्रामीण डाकसेवक यांच्या नेतृत्वाखाली डाकसेवकांनी गुरुवारी (दि. १६) आणि शुक्रवारी (दि. १७) देशव्यापी संपाची हाक दिली होती. मात्र, नवी दिल्लीच्या डाक भवनात टपाल विभागाच्या संचालकांसाेबत युनियनच्या शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत संप स्थगित करीत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे डाकसेवक सकाळपासून कामावर हजर झाले.

टपाल विभागाच्या संचालक आणि युनियनच्या शिष्टमंडळात विविध विषयांवर चर्चा झाली. डॉ. कमलेशचंद्र कमिटीच्या शिफारशीनुसार १२, २४ व ३६ वर्षांच्या नोकरीनुसार पदोन्नती देण्यासह वेतन टीआरसीए देण्याचा प्रस्ताव ३१ मार्चपर्यंत अर्थ मंत्रालयाकडे पाठविण्याचे संचालकांनी मान्य केले. सामुदायिक विमा पाच लाख रुपये करावा, विभागीय स्तरावर अधिकाऱ्यांकडून होणारे गैरप्रकार थांबवावेत, आयुष्मान भारत योजनेंतर्गत वैदयकीय सुविधा आदी मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन टपाल विभागाकडून देण्यात आले. तर ग्रॅच्युईटी दीड लाखाऐवजी पाच लाख करण्याची मागणी फेटाळण्यात आली. दरम्यान, टपाल विभागाच्या संचालकांसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे संप स्थगित करण्यात आला आहे. मान्य केलेल्या मागण्यांच्या अंमलबाजवणीसाठी ३१ मार्चची डेडलाइन देण्यात आली आहे. अन्यथा एप्रिलमध्ये पुन्हा बेमुदत संप केला जाईल, असे डाकसेवक युनियनचे विभागीय सचिव सुनील जगताप यांनी सांगितले.

हेही वाचा:

Back to top button