Rainfall forecast : हवामान विभागाचा अंदाज ठरतोय खरा; राज्यातील अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची हजेरी | पुढारी

Rainfall forecast : हवामान विभागाचा अंदाज ठरतोय खरा; राज्यातील अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची हजेरी

पुढारी ऑनलाईन डेस्क: काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रासह गोवा, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यांना गडगडाटांसह हलक्या आणि मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला होता. यासह महराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडा यासह विविध भागातही १५, १६, १७ आणि १८ मार्च दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली होती. दरम्यान, हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज खरा ठरत आहे. राज्यातील अनेक भागात मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली आहे. तर काही राज्यातील काही ठिकाणी गारपीट झाल्याची माहितीही हवामान विभागाने दिली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील कोकण किनारपट्टी, मुंबई, पुणे, ठाणे, सातारा, सांगली या भागात विजांच्या गडगडाटांसह पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या 24 तासात राज्यातील नंदूरबार, नाशिक, कोल्हापूर, पिंपरी, पुणे, मुंबई आणि ठाण्यात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. राज्यातील काही ठिकाणी गारपीटही झाली असल्याने शेतमालाचे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. तर पुढच्या २ ते ३ दिवस अशीच परिस्थिती कायम राहणार असून, मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपीटची शक्यता कायम आहे. त्यामुळे या दरम्यान काळजी घेण्याचे आवाहन देखील हवामान खात्याने केले आहे.

पुढचे काही दिवस अशी असणार पावसाची स्थिती

उत्तर तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, पूर्व गुजरात, ओडिसा, पश्चिम बंगाल, झारखंड या राज्यांमध्‍येही १५ ते १७ मार्च दरम्यान हलका पाऊस (IMD Rainfall Alert) पडेल. तसेच राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढचे काही दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच १६ मार्चपासून १९ मार्चपर्यंत विदर्भातील नागपूर, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्‍ह्यांत ) भारतीय हवामान विभागाकडून अतिसतर्कतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे.

हेही वाचा:

Back to top button