सातारा; पुढारी वृत्तसेवा : बुधवारी दुपारी व नंतर सायंकाळी जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाने तडाखा दिला. जिल्ह्यात सातारासह वाई, खंडाळा, जावली तालुक्यांत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. ऐन सुगीत अचानक आलेल्या पावसामुळे काढणीस आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
सातारा शहरात सायंकाळी विजांच्या कडाकडाटासह पावसाने हजेरी लावली. पावसाने शहर परिसरात धडकी भरवणारा विजांचा कडकडाट रात्री सुरू असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शहर परिसरातील वीजही अधूनमधून गायब होत होती.
वाई शहर व परिसराला बुधवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने झोडपून काढले. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची त्रेधातीरपीट उडाली. पावसापूर्वी आलेल्या सोसाट्याच्या वार्यामुळे फळबागांसह बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गेले काही दिवस सर्वत्र ढगाळ वातावरण होते. हुलकावणी देणार्या पावसाने बुधवारी दुपारी वाई शहरासह तालुक्याच्या काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून थोडाफार दिलासा मिळाला असला तरी पाऊसाआधी आलेल्या सोसाट्याच्या वार्यामुळे आंब्यासह इतर फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच ढोबळी मिरची, भुईमुग, काकडी, टमॅटो या बागायती पिकांना या पावसाचा फटका बसला आहे. शेतात सध्या गहू, ज्वारी काढणीला सुरुवात झाली आहे. अचानक झालेल्या पावसामुळे हाता-तोंडाशी आलेली रब्बी हंगामातील पिके वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भुईंज-पाचवड परिसरात अवकाळी पावसामुळे गहू, ज्वारी, हरभरा, टोमॅटो या पिकांसह इतर पिकांचे नुकसान झाले आहे. परिसरातील सर्वच गावांमध्ये वीज पुरवठाही खंडीत झाला होता.
पारगाव खंडाळा परिसरात बुधवारी सायंकाळी सुमारे तासभर विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. अवेळी आलेल्या पावसामुळे शेतकरी व नागरिकांची एकच धांदल उडाली. गहू, हरभरा, ज्वारी इत्यादी रब्बीची पिके कापून शेतात ठेवली असल्याने ती पावसापासून वाचवण्यासाठी शेतकर्यांना मोठी कसरत करावी लागली . सध्या गव्हाची कापणी सुरू असून सर्वत्र गहू कापून ठेवलेला आहे. मात्र संध्याकाळी अचानक आलेल्या पावसामुळे अनेक शेतकर्यांचा कापून ठेवलेला गहू, हरभरा भिजला. त्यामुळे काही शेतकर्यांचे नुकसान झाले. या पावसामुळे सायंकाळी हवेत गारवा निर्माण झाला.
बुधवारी दुपारी कुडाळ ता. जावली येथे वादळी वार्यासह मुसळधार पाऊस कोसळला. बुधवार हा कुडाळचा आठवडी बाजाराचा दिवस होता. मात्र, वादळी वार्यासह आलेल्या पावसाने सर्वांचीच त्रेधातिरपीट उडाली. गेली काही दिवस उष्णतेत प्रचंड प्रमाणात वाढ झाली असून दररोज आभाळही येत आहे. बुधवारी वादळी वार्यासह मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे आठवडी बाजार लवकर उठला. कुडाळसह करहर, मेढा, सरताळे, सायगाव, आणेवाडी, केळघर परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वारे व विजांच्या कडकडाटात तसेच ढगांच्या गडगडाटात पाऊस पडला. ऊस हंगाम अंतिम टप्प्यात असताना पाऊस पडल्याने ऊसतोड मजूर व ऊस उत्पादक शेतकर्यांची तारांबळ उडाली. गहू, हरभरा अशा काढणीला आलेल्या पिकांना पावसाचा फटका काही प्रमाणात बसला आहे.
दांडेघर येथील टेबल लॅन्ड पठारावर वीज कोसळून दोन म्हशींचा दुर्दैवी मृत्यू झाला. दांडेघर गावातील ग्रामस्थ आपल्या म्हशी चरण्यासाठी पठारावर घेऊन गेले होते. पडलेल्या पावसामुळे जोरदार वीज कोसळल्याने दोन म्हशी जागीच ठार झाल्या. या घटनेने सौ. गीता बाळू राजपुरे यांचे सुमारे एक लाखाचे नुकसान झाले आहे.