नाशिक : देवळ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन | पुढारी

नाशिक : देवळ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा

कांद्याला भाव मिळाला पाहिजे, विमा कंपनीने रोखलेला पीकविमा, कृषी पंपाला दिवसाला वीज, थकित उसाची एफआरपी आदी मागण्यासाठी आज बुधवार, दि २२ रोजी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देवळा कळवण मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या भावनांविषयी तहसीलदार विजय सूर्यवंशी यांना निवेदन सादर करण्यात येऊन आंदोलन मागे घेण्यात आले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या रास्ता रोको आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच कांदा उत्पादक शेतकरी व शेतमजूर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जवळपास एक तास चाललेल्या आंदोलनामुळे देवळा कळवण मार्गावरील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली. यावेळी शेतकरी एकजुटीचा विजय असो ,कांद्याला भाव मिळालाच पाहिजे अशा प्रकारे तीव्र घोषणा देण्यात आल्या. केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. वीज पुरवठा सुरळीत करावा, कांद्याचे भाव ४०० ते ९०० रुपयांच्या खाली आले आहेत. केंद्र सरकारने नाफेड मार्फत कांदा खरेदी करून ग्राहक हित जोपासण्यापेक्षा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन जास्तीत जास्त कांदा निर्यात करण्यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे त्यासाठी नोटीफिकेशन जारी करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शिरसाठ, तालुका समन्वयक कुबेर जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंडीतराव निकम, नगरसेवक संतोष शिंदे, शहर अध्यक्ष दिलीप आहेर, सचिन सूर्यवंशी, कांदा उत्पादक संघटनेचे जयदीप भदाणे, शिवाजी पवार आदींसह विनोद आहेर, महेंद्र आहेर, संजय सावळे, तुषार शिरसाठ, मधुकर पंचपिंडे, सुभाष पवार, कैलास कोकरे, पी. डी. निकम, प्रवीण निकम आदी शेतकरी उपस्थित होते. तहसीलदार विजय सूर्यवंशी, परिविक्षाधीन तहसीलदार गौरी धायगुडे, सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांना निवेदन सादर करण्यात आले.

हेही वाचा:

Back to top button