पुणे : वाहन हस्तांतरण सुविधेची अंमलबजावणी नाही ; बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील प्रकार | पुढारी

पुणे : वाहन हस्तांतरण सुविधेची अंमलबजावणी नाही ; बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील प्रकार

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  परिवहन सेवेत वाहन हस्तांतरित करण्यासाठी राज्यातील सर्व एमएच 01 ते 56 उपप्रादेशिक कार्यालयांची नावे दिली आहेत. त्यातील एका उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची निवड करून वाहन हस्तांतरित करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून होत नाही. शासनानेच परिवहन सेवेमध्ये वाहन हस्तांतरित करण्याची जी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याप्रमाणे राज्यातील कोणत्याही उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन हस्तांतरित करून देण्याचे आदेश बारामती उप्रादेशिक परिवहन कार्यालयास देऊन सामान्य जनतेची होणारी अडवणूक थांबवावी, अशी मागणी नागरिकांकडून वाढू लागली आहे.

राज्यात यापूर्वी वाहनांची एनओसी दिली जात होती, परंतु ती बंद करण्यात आली व परिवहन ऑनलाइन सेवेमध्ये वाहन हस्तांतरित करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांची नावे दिली आहेत. त्यातील एका उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची निवड करून वाहन हस्तांतरित करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. असे असूनही बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ही सुविधा अद्याप उपलब्ध करून दिली जात नसल्याने वाहनधारकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
यापूर्वी राज्यातील कोणत्याही उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून दुसर्‍या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन हस्तांतरित करण्यासाठी एनओसी दिली जात होती. परंतु, शासनाने एनओसी देणे बंद करून परिवहन सेवेत वाहन हस्तांतरित करण्यासाठी राज्यातील सर्व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची नावे उपलब्ध करून दिली आहेत; मात्र येथे त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.

राज्यात एका कार्यालयातून दुसर्‍या परिवहन कार्यालयात वाहन हस्तांतरण करण्यासाठी परवानगी दिली जाते. त्यानुसार तेथील वाहने बारामती कार्यालयाकडे हस्तांतरित होतात. परंतु येथील कार्यालयातून राज्यातील सर्व परिवहन कार्यालयात वाहन हस्तांतरित होणे अपेक्षित आहे.
                                         – दिगंबर पडकर, जिल्हाप्रमुख, वाहतूक सेना

Back to top button