मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिकमध्ये भरगच्च कार्यक्रम | पुढारी

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिकमध्ये भरगच्च कार्यक्रम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत नाशिक शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. अनुकंपा तत्त्वावर भरतीत प्रामुख्याने गट ‘क’ व ‘ड’ संवर्गातील पात्र तब्बल 264 उमेदवारांना नियुक्तिपत्र वाटप करण्यात येणार आहे. नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवन येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी दिली.

अन्य कार्यक्रमात छत्रपती शिवाजी स्टेडियमवर 20 टक्के जिल्हा परिषद सेसनिधी अंतर्गत मागासवर्गीय युवतींना सायकल वाटप, महिलांसाठी मसाला कांडप तसेच चारचाकी वाहन वाटप करण्यात येणार आहे. यात 30 चारचाकी वाहन तसेच 59 सायकली विद्यार्थिनींना देण्यात येईल. तसेच रिक्षा सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, यशस्वी स्पर्धकांना पारितोषिक वितरण केले जाणार आहे.

संजय काजळे यांच्या मातोश्री स्व. कौशल्या काजळे फाउंडेशनच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले, पत्नी यांना नांदूर नाका येथे शैक्षणिक साहित्य, साड्या व ब्लॅंकेट वाटप केले जाणार आहे. याचबरोबर बाळासाहेबांची शिवसेना महिला आघाडी (नाशिक मध्य) तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर, नेत्ररोग निदान शिबिर, दंतरोग व मुखआरोग्य शिबिर, स्त्री आरोग्य तपासणी शिबिर, अस्थिरोग तपासणी शिबिर होणार आहे. सिडकोतील पुष्पस्वरूप धर्मार्थ दवाखाना येथे हे शिबिर होईल. शहरात वैद्यकीय महाविद्यालय व महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर व धर्मवीर आनंद दिघे साहेब महाआरोग्य अभियानांतर्गत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले असून, या कार्यक्रमांना ना. भुसे भेट देणार असल्याची महिती बाळासाहेबांची शिवसेना पक्षमार्फत देण्यात आली आहे.

बाळासाहेबांच्या शिवसेना वैद्यकीय कक्षामार्फत गोल्फ क्लब मैदानात ८ ते १२ फेब्रुवारीदरम्यान क्रिकेट स्पर्धा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री क्रिकेट चषक स्पर्धेचे उद्घाटन नाशिक मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्या हस्ते तर नाशिक सेंट्रल जेलचे अधीक्षक प्रमोद वाघ, पोलिस उपआयुक्त किरण चव्हाण, सचिन चिकने, सहसंपर्कप्रमुख राजू लवटे, जिल्हाप्रमुख अनिल ढिकले आंदींच्या उपस्थितीत झाले. उद्घाटन सोहळ्यानंतर मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकंडवार यांनी फलंदाजी तर अजय बोरस्ते यांनी गोलदांजी करत स्पर्धेची सुरुवात केली. विजेत्या संघाला तीन लाख ५६७, उपविजेता संघाला दोन लाख ५६७, तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघाला एक लाख ५६७ तर चौथा क्रमांक पटकावणाऱ्या संघाला ७५ हजार ५६७ रुपये असे बक्षीस देण्यात येणार आहे. पारितोषिक वितरण रविवारी १२ फेब्रुवारीला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

हेही वाचा :

Back to top button