पुणे : वसुलीसाठी खासगी कर्मचारी? आरोग्यमंत्र्यांच्या आरोपाची पालिका करणार चौकशी | पुढारी

पुणे : वसुलीसाठी खासगी कर्मचारी? आरोग्यमंत्र्यांच्या आरोपाची पालिका करणार चौकशी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरातील अतिक्रमण अधिकारी आणि कर्मचारी खासगी लोकांची नेमणूक करून व्यावसायिकांकडून मनमानी पद्धतीने दंड वसूल करतात, अशी तक्रार राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी केली आहे. या तक्रारीची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.

महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने सोमवारी धनकवडी येथील संभाजीनगर येथील पदपथावर अतिक्रमण करून बेकायदा व्यवसाय करणार्‍यांवर कारवाई केली. या कारवाईत एक हातगाडी आणि एक टेम्पो जप्त करण्यात आला. ही हातगाडी व टेम्पो सोडवण्यासाठी काही संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी प्रयत्न केला.

मात्र, धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयातील अधिकार्‍यांनी दंड भरल्यानंतरच हातगाडी व टेम्पो सोडण्याचा पवित्रा घेतला. त्यानंतर संबंधित पदाधिकार्‍याने राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना घडलेला प्रकार सांगितला. सावंत यांनी फोनवरून क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकार्‍यास हातगाडी व टेम्पो सोडण्याची सूचना केली. तरीही अधिकारी ऐकत नसल्याने सावंत यांनी थेट धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयच गाठले.

कारवाई करून जप्त केलेली हातगाडी आणि टेम्पो तत्काळ सोडून द्या, असे म्हणत सावंत यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले.
त्यावर कारवाई कायद्यानुसार असून, नियमानुसार दंड भरल्यावर ते सोडले जाईल, अशी भूमिका अधिकार्‍यांनी घेतली होती. त्यानंतर सावंत यांनी महापालिका आयुक्तांना फोन करून संबंधित अतिक्रमण निरीक्षकावर कारवाई करावी, त्याला निलंबित करावे, असे आदेश दिले.

प्रशासन ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे समजताच दंडाचे दहा हजार रुपये भरून हातगाडी सोडवण्यात आली. त्यानंतर सावंत यांनी अतिक्रमण अधिकारी आणि कर्मचारी स्वतः कारवाईसाठी न जाता खासगी लोकांना कारवाईसाठी पाठवतात. हे लोक मनमानी पद्धतीने दंड वसूल करतात, अशी तक्रार महापालिका आयुक्तांकडे केली. सावंत यांनी केलेल्या तक्रारींची दखल घेऊन आयुक्तांनी दुसर्‍या दिवशी महापालिकेत बैठक घेऊन यासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात घडलेल्या घटनेनंतर आरोग्यमंत्र्यांनी केलेल्या तक्रारीची चौकशी केली जाणार आहे. यामध्ये कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे.
                                               – विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका.

Back to top button