पुणे : मतदानासाठी दिव्यांगत्व ओळखपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार

पुणे : मतदानासाठी दिव्यांगत्व ओळखपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघांसाठी 26 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. मतदानासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्र नसल्यास निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्यापैकी एक पुरावा ओळख पटविण्यासाठी ग्राह्य धरण्यात येईल. त्यात केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाने दिलेल्या दिव्यांगत्व ओळखपत्राचा समावेश करण्यात आला आहे.

मतदाराला त्याच्या/तिच्या मतदान केंद्राच्या मतदारयादीचा अनुक्रमांक जाणून घेण्याची सुविधा देण्यासाठी मतदानाची तारीख, वेळ आदी नमूद असलेली मतदार माहितीचिठ्ठी देण्यात येणार आहे. यात मतदान केंद्र, तारीख, वेळ आदी माहितीचा समावेश असेल. सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदानाच्या दिवसाच्या आधी माहितीचिठ्ठी वितरित केली जाईल. परंतु, अशी चिठ्ठी मतदानासाठी पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाणार नाही. सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

ओळखीसाठी बारा पुरावे
मतदान करताना मतदार छायाचित्र ओळखपत्र सोबत असणे गरजेचे आहे. असे ओळखपत्र नसल्यास ओळख पटविण्यासाठी आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँकांचे/टपाल कार्यालयाचे छायाचित्र असलेले पासबुक, श्रम मंत्रालयाच्या योजनेंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड, वाहनचालक परवाना (ड्रायव्हिंग लायसेन्स), पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) अंतर्गत भारताचे महानिबंधक (आरजीआय) द्वारा जारी केलेले स्मार्ट कार्ड, भारतीय पारपत्र (पासपोर्ट), छायाचित्र असलेले निवृत्तिवेतन दस्तावेज, राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांनी कर्मचार्‍यांना जारी केलेले छायाचित्रासह सेवा ओळखपत्र; खासदार, आमदार यांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र आणि केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने दिलेले दिव्यांगत्वाचे ओळखत्र (युनिक डिसेबिलिटी आयडी) यापैकी कोणताही एक पुरावा मतदान केंद्रावर घेऊन जाणे आवश्यक आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news