पुणे : माथाडीच्या नावाखाली खंडणी; दोघांवर गुन्हे | पुढारी

पुणे : माथाडीच्या नावाखाली खंडणी; दोघांवर गुन्हे

पुणे; पुढारी वृत्तसेवा : माथाडीच्या नावाखाली फिनिक्स मॉल विमाननगर येथील चालकाकडून बेकायदा खंडणी उकळणार्‍या दोघांवर कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथक दोनने ही कारवाई केली. रवींद्र ऊर्फ रवी जयप्रके (रा. चंदननगर) हा सराईत सध्या पोलिस कोठडीत असून, त्याची महिला साथीदार मंगल सातपुते (रा. लोहगाव) हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड येथील व्यावसायिक जितेंद्र राहुल राम (रा. पुनावळे, चिंचवड) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात खंडणीची तक्रार दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 डिसेंबर रोजी फिनिक्स मॉल विमाननगर येथील फर्स्ट क्राय या कंपनीच्या शोरूमचे इंटर रिन्युवेशनचे काम करत असताना त्या कामासाठी लागणार्‍या प्लायवुडचा भरलेला ट्रक फिनिक्स मॉल येथे आला होता.

त्या वेळी रवी ससाणे आणि त्याची साथीदार मंगल सातपुते या दोघांनी फिर्यादी यांच्या कामगारांना ट्रकमधील प्लायवुड खाली करू न देता त्यांची अडवणूक केली. ‘आम्ही येथील स्थानिक आहोत,’ असे सांगून तेथे काम न करता फिर्यादी यांच्याकडे आठ लाख रुपयांची मागणी करून तडजोडीअंती साडेचार लाख रुपये ठरले. त्यासाठी धनादेशाद्वारे दोन लाख रुपये घेतले.

तसेच उर्वरीत पैशासाठी फोन करून फिर्यादी यांना भेटून तसेच फोनद्वारे धमकावून पैशाची मागणी केली. आरोपींच्या वारंवारच्या त्रासाला कंटाळून जितेंद्र यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, मोहनदास जाधव, अंमलदार विजय गुरव, शैलेश सुर्वे, राहुल उत्तरकर, सैदोबा भोजराव, सचिन अहिवळे, अमोल पिलाने, प्रदीप शितोळे यांच्या पथकाने कारवाई केली.

Back to top button