शेतकऱ्यांसाठी कृषी महोत्सव उपयुक्त : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जागतिक कृषी महोत्सवात प्रतिपादन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देणारे कृषी महोत्सव हे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहेत, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कृषी महोत्सवामधून सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होत असल्याचे काैतुकोद्गारही ना. शिंदे यांनी काढले.
डोंगरे वसतिगृह मैदानावर स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे आयोजित जागतिक कृषी महोत्सवाचा समारोप रविवारी (दि. २९) मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर गुरुमाउली अण्णासाहेब मोरे, पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, भरत गोगावले, बबनराव लोणीकर, सुहास कांदे, संजय शिरसाट, बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) सचिव भाऊसाहेब चाैधरी, जिल्हाप्रमुख अजय बाेरस्ते, राजू लवटे, बंटी तिदमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आदी उपस्थित होतेे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, गेल्या सहा महिन्यांत शासनाने अनेक लोकहितकारी निर्णय घेतले. वातावरणीय बदल ही शेतकऱ्यांसाठी मोठी समस्या आहे. अशावेळी अतिवृष्टी व सततच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी एनडीआरएफचे नियम बाजूला सारत मदत करण्यात आली. नियमित कर्जफेड करणाऱ्या राज्यातील सहा लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एका क्लिकवर अडीच हजार कोटींचे अनुदान जमा केल्याचेही शिंदे यांनी सांगितले.
अनेक संस्था शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यक्रम राबवतात. कालौघात ते बंद पडतात. पण, गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांच्या प्रेरणेतून विविध उपक्रम अविरत सुरू आहेत. असे सांगत, कृषी महोत्सव हा त्याचाच भाग असून त्याद्वारे सेंद्रिय शेतीला दिले जाणारे प्रोत्साहन कौतुकास्पद असल्याचेही शिंदे म्हणाले. कृषी महोत्सवातून प्रगत शेती तंत्रज्ञान, गटशेती, अवजारांना आधुनिकतेची जोड, नवीन बी-बियाणे आदींबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन ठरेल, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला. बबनराव लोणीकर यांनी प्रास्ताविकात मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राम-लक्ष्मणाची जोडी म्हणून नामोल्लेख करताना पुढील २५ वर्षे ते राज्यावर सत्ता करतील, असे मत व्यक्त केले.
महाराष्ट्राच्या पाठीशी केंद्र
केंद्र सरकार हे महाराष्ट्राच्या पाठीशी असून तब्बल २ लाख कोटी रुपये विविध प्रकल्पांसाठी केंद्र शासनाने उपलब्ध करून दिले. या निधीतून रखडलेले महामार्ग, रेल्वे प्रकल्प व विकासकामे मार्गी लावल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. जनता व राज्याचा विकास ही आमची जबाबदारी असून त्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. समृद्धी महामार्ग हा शेतकरी व राज्यासाठी गेम चेंजर ठरेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
हेही वाचा :
- पुणे : आरटीई नोंदणीच्या आदेशाला केराची टोपली; अनेक जिल्ह्यांत शाळांकडून नोंदणीला सुरुवातच नाही
- स्मार्ट फोनच्या विक्रीत घट
- नाशिक पदवीधर’साठी आज मतदान, १६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत होणार बंद