Raj Thackeray : ...अन् सुरेश जैनांचं मुख्यमंत्री पद हुकलं, राज ठाकरेंचा गौप्यस्फोट | पुढारी

Raj Thackeray : ...अन् सुरेश जैनांचं मुख्यमंत्री पद हुकलं, राज ठाकरेंचा गौप्यस्फोट

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

भाजपने सुरेश जैन यांना मुख्यमंत्री करण्यासाठी चर्चा केली होती. मात्र, सुरेश जैन मराठी भाषिक नाहीत म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९९९ साली जैन यांना मुख्यमंत्री करायला नकार दिला होता. याबाबतचा गौप्यस्फोट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.

विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या. यावेळी बाळासाहेबांची मराठी भाषिकांविषयीची भूमिका सांगताना जळगावचे माजी आमदार सुरेश जैन यांच्या मुख्यमंत्री पदाबाबतचा उल्लेख केला.

काय म्हणाले राज ठाकरे?

बाळासाहेब ठाकरे हे कडवट मराठी होते. १९९९ सालची गोष्ट आहे. काही कारणास्तव शिवसेना-भाजप युती मुख्यमंत्री पदावर अडत होती. १५-२० दिवस राजकारण सुरू होते. आमदारांचे इकडे-तिकडे जाणे सुरू होते. एके दिवशी दुपारच्या वेळी ‘मातोश्री’वर दोन गाड्या आल्या. त्यातून जावडेकर आणि आणखी भाजपचे दोन-चार जण आले. बाळासाहेबांना भेटायचे असे म्हणाले. आज आपले सरकार बसेल, त्यामुळे बाळासाहेबांची भेट महत्त्वाची आहे असे म्हणाले. परंतु बाळासाहेब झोपले होते. राज ठाकरे म्हणाले निरोप देतो पण भेट शक्य नाही. राज ठाकरेंनी त्यांना उठवून निरोप दिला की, भाजपचे नेते आले आहेत. त्यांनी सांगितले की, संध्याकाळपर्यंत सरकार बसेल. सुरेश जैन मुख्यमंत्री असतील, ते आमदारांची जुळवाजुळव करतील. त्यावर बाळासाहेब म्हणाले, त्यांना जाऊन सांग, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच असेल. दुसरा असणार नाही. असे म्हणून ते पुन्हा झोपी गेले. मराठी बाण्यासाठी या माणसाने माझ्यासमोर सत्तेवर लाथ मारल्याची आठवण राज ठाकरेंनी सांगितली.

हेही वाचा :

Back to top button