पुणे : पुस्तक प्रकाशनाला महापालिकेने परवानगी नाकारली | पुढारी

पुणे : पुस्तक प्रकाशनाला महापालिकेने परवानगी नाकारली

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ‘इशरत जहाँ एन्काउंटर’ या पुस्तक प्रकाशनाच्या नियोजित कार्यक्रमाला गंज पेठेतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकातील सभागृह देण्यास पुणे महापालिकेने मंगळवारी परवानगी नाकारली. त्यामुळे हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला असून, लवकरच पुस्तक प्रकाशनाची तारीख जाहीर केली जाईल, अशी माहिती आयोजकांनी दिली. दरम्यान, कार्यक्रमस्थळी मंगळवारी सायंकाळी पोलिस बंदोबस्त होता. तर या पुस्तकाबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी पोलिस आयुक्तांना त्याची प्रत देणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या पुस्तकाचे प्रकाशन गंज पेठेतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकातील सभागृहात मंगळवारी नियोजित होते. मात्र, विद्युत विभागामार्फत करण्यात येणार्‍या सभागृहातील एसीच्या यंत्रणेचे दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे कारण देत महापालिकेने कार्यक्रमाला परवानगी नाकारली, असे आयोजक मुस्लिम मूलनिवासी मंचचे अंजुम इनामदार यांनी सांगितले. या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी सावित्रीबाई फुले स्मारकातील सभागृह आरक्षित करून त्याचे पैसे भरले होते, तसेच कार्यक्रमाची माहिती पोलिसांनाही दिली होती.

मात्र, ऐनवेळी महापालिकेने सभागृहातील दुरुस्तीचे कारण देत कार्यक्रमाला परवानगी नाकारली, तसेच पोलिस प्रशासनाला याबाबतचे पत्र दिले. त्यानंतर पोलिसांनी आयोजकांना नोटीस देऊन परवानगी रद्द करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार, आयोजकांनी बैठक घेऊन हा कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेतला असून, लवकरच पुढील तारीख ठरविण्यात येईल, असे इनामदार यांनी सांगितले.

सभागृहातील एसीच्या यंत्रणेचे दुरुस्तीचे काम आधीच नियोजनात असल्यामुळे आणि सभागृहात विद्युत विभागाच्या दुरुस्तीच्या कामामुळे मंगळवारी होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. फक्त पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रमच नाही तर सर्वच कार्यक्रम रद्द केले.

          – संतोष वारुळे, उपायुक्त, क्रीडा आणि सांस्कृतिक विभाग, महापालिका

Back to top button