लसीकरणासाठी पात्र असणाऱ्या देशातील ७९ टक्के लोकांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर ३८ टक्के लोकांना दुसरा डोस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया (Dr. Mansukh Mandviya ) यांनी आज गुरूवारी दिली.
देशात कोरोना विरूद्धची लढाई जिंकण्यासाठी लसीकरणापासून कोणताही नागरिक वंचित राहू नये, यासाठी सर्वांनी एकत्रित येवून सरकारला सहकार्य करण्याची गरज असल्याचे मांडविया म्हणाले. कोरोना लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी ३ ते ३० नोव्हेंबर दरम्यान देशात 'हर घर दस्तक' हे अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानाबाबत राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांतील आरोग्य मंत्र्यांची आज ऑनलाईन बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्यासह महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचाही सहभाग होता.
यावेळी मंत्री मांडविया (Dr. Mansukh Mandviya ) यांनी, देशातील प्रत्येक भागात आणि घराघरात पोहचून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'हर घर दस्तक' मोहिमेअंतर्गत लोकांना लसीचे दोन्ही डोस घेण्यास प्रवृत्त करावे असे आवाहन केले. त्यानंतर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील कोरोना महामारीचे नियंत्रण तसेच त्याच्या व्यवस्थापनासाठी सार्वजनिक आरोग्य उपाय योजनांचाही आढावा घेतला.
लसीकरणाचा पहिला डोस घेतलेल्या देशातील १२ कोटींहून अधिकजणांन अद्यापही लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही. तर ज्यांनी अद्याप लसीचा पहिला डोस घेतलेला नाही अशा नागरिकांना प्रत्येक राज्यातील आरोग्य मंत्र्यांनी, केंद्राच्या अभियानांतर्गत लसीकरणासाठी प्रवृत्त करण्याचे आवाहन मंत्री मांडविया यांनी केले.
लसीकरणाबाबत लोकांत जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि लसीकरण सेवा प्रदान करण्यासाठी स्थानिक साप्ताहिक बाजार आणि हाटांचा वापर करावा, स्थानिक पातळीवर धार्मिक आणि समुदाय नेत्यांचे सहकार्य घेण्यासह एनसीसी तसेच एनएसएसच्या विद्यार्थ्यांची मदत घ्यावी. त्याचबरोबर शहरी आणि ग्रामीण भागात लसीकरण न झालेल्यांना प्रवृत्त करण्यासाठी, डिजीटल माध्यमांतून जागरूकता करावी अशा सुचनाही मांडविया यांनी यावेळी केल्या.
लसीकरण मोहीमेत मुलांचा सहभाग वाढवल्यास ती पूर्ण होण्यास मदत होईल. हे लक्षात घेऊन, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी मुलांचा सहभाग वाढवावा. "मुलांना त्यांच्या पालकांना आणि इतर कुटुंबातील सदस्यांना लसीचे दोन्ही डोस घेण्यास प्रवृत्त करू द्या", असेही ते म्हणाले.
बैठकीत सहभागी झालेल्या विविध राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांनी कोरोना व्यवस्थापनासाठी लस, औषधे, आर्थिक आणि तांत्रिक बाबींची पुर्तता तत्काळ केल्याबद्दल केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे आभार मानले. मांडविया यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून मिळत असलेल्या पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त करत, "हर घर दस्तक" मोहिमेअंतर्गत लसीकरणासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.
पहा व्हिडीओ : …आणि या गावाच नाव अपशिंगे मिलिटरी पडलं