बारामती पॅटर्न हाच भाजपचा छुपा अजेंडा : जयंत पाटील | पुढारी

बारामती पॅटर्न हाच भाजपचा छुपा अजेंडा : जयंत पाटील

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
प्रत्येक अर्थमंत्र्याला त्यांच्या मतदारसंघात चांगला विकास करावा, अशी इच्छा असते. परंतु, हा विकास कधी व कसा करायचा याची माहिती नसल्याने गोंधळ उडतो. बारामती विकासाचा पॅटर्न पाहण्यासाठी भाजपने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची बारामती मतदारसंघाच्या निरीक्षकपदी नेमणूक केली, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार न्यायालय आणि आयोग यांच्यात अडकल्याने त्यांना काम करण्याची संधी मिळत नसल्याचा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेसने 2024 च्या निमित्ताने राज्यभरात पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. त्या अंतर्गत पाटील यांनी गुरुवारी (दि.22) नाशिकचा दौरा करून पक्षाचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले की, बारामतीमध्ये राष्ट्रवादी भक्कम असल्याचे भाजपला माहिती असूनही त्यांनी ना. सीतारामन यांची मतदारसंघाच्या निरीक्षकपदी नियुक्ती केली. भाजपचे मिशन बारामती असले तरी यानिमित्ताने गॅस, डिझेल, अन्नधान्याच्या वाढत्या महागाईबाबत प्रश्न विचारण्याची संधी बारामतीकरांना उपलब्ध झाल्याची खोचक टीका पाटील यांनी केली.

राज्यातील शिंदे सरकारमधील 40 आमदारांच्या डोक्यावर अपात्रतेची टांगती तलावर कायम आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी 40 आमदारांच्या मतदारसंघात केलेल्या दौर्‍यावेळी जनतेचा भरघोस पाठिंबा लाभतो आहे. त्यामुळे सत्ताधार्‍यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. तरीही 40 आमदारांना मंत्री होण्याची अपेक्षा लागून आहे. दुसरीकडे 106 आमदार असूनही उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागल्याने भाजपतही नाराजीचा सूर आहे. त्यामुळे असे अस्थिर सरकार सांभाळणार्‍या मुख्यमंत्र्यांबद्दल सहानुभूती असल्याचे पाटील म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेनेने आघाडी करून निवडणुकांना सामोरे जावे, अशी अपेक्षा आहे. पण, आघाडीचे अधिकार हे स्थानिक स्तरावरच दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आताच्या सरकारची जबाबदारी :

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर जाण्याला सर्वस्वी शिंदे सरकार जबाबदार आहे. तसे नसल्यास ना. एकनाथ शिंदे यांनी करार करण्यासाठी कंपनीला पत्र का दिले होते, असा प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित केला. मविआ सरकारने प्रकल्पाला 39 हजार कोटींच्या सवलती देण्याची तयारी दर्शविली असताना 29 हजार कोटी रुपयांची सुट देणार्‍या गुजरातमध्ये प्रकल्प जातोच कसा? तसेच याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे दिलीश्वरांपुढे जाऊ शकत नसल्याने वेदांताचे अनिल अग्रवाल यांना भेटण्याची हिंमत करत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

ना. फडणवीस यांना विचारणा करेल
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2019 मध्ये मविआने मला संपविण्याचा आरोप केला. याबाबत जयंत पाटील यांना विचारले असता विरोधी पक्षनेते असताना मविआने नेहमीच ना. फडणवीसांचा सन्मान राखला. चांगल्या लोकशाहीसाठी विरोधी पक्ष सक्षम असला पाहिजे. त्यामुळे कुठेही त्यांना राजकारणातून संपविण्याचा प्रयत्न केला नसून ते असे का बोलले माहिती नाही. पण, त्यांची भेट झाल्यावर नक्कीच मी त्यांना याबाबत विचारणा करेल, असे पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button