पुणे : आत्महत्या रोखण्यावर अभ्यास समिती नेमणार: कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती | पुढारी

पुणे : आत्महत्या रोखण्यावर अभ्यास समिती नेमणार: कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती

पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्यात शेतकरी आत्महत्या होणार नाहीत, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्यावर स्वतंत्र समिती स्थापन करून शेतकर्‍यांना नेमक्या कोणत्या अडचणी येतात हे जाणून घेऊन पुढील भूमिका ठरविली जाईल, अशी माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी येथे दिली. दरम्यान, सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याच्या प्रस्तावावर तूर्तास कोणताही निर्णय झालेला नसून शेतकर्‍यांच्या हिताखातर वाईन विक्रीला पाठिंबा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

येथील महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या बैठकीनंतर गुरुवारी (दि.22) ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील यापूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारने दुकांनामधून वाईन विक्री करण्याचा प्रस्ताव आणला होता. त्या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळालेली नसल्याचे नमूद करून ते म्हणाले, वाईनचा अर्थ लोक वेगळ्या पद्धतीने काढतात, असेही ते म्हणाले.

शेतीवरचा बोजा कमी करा असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणत असले तरी शालेय स्तरापासून कृषी शिक्षण वाया तर जाणार नाही ना? शेतकर्‍याचा मुलगा काही नाही बनला तरी तो शेतकरी बनू शकतो. शेतकर्‍याचा मुलगा मुख्यमंत्री झाला असं एकनाथ शिंदे म्हणाले. त्यावरून काहींच्या पोटात पोटशूळ उठला आहे, असेही सत्तार यांनी म्हटले आहे.

‘हिंदू बांधवांची सेवा करतो हेच माझे हिंदुत्व आहे. माझ्या धर्माचा मला स्वाभिमान आहे; पण हिंदूंचा सन्मानही मी करतो. त्यांचं हिंदुत्व फक्त भाषणपुरतं आहे. मला पालकमंत्री म्हणून कोणत्याही जिल्ह्याची जबाबदारी दिली तरी मी स्वीकारणार आहे,’ असे सत्तार म्हणाले. टीईटीमध्ये आमच्या कुटुंबीयांचा सहभाग असेल तर त्याचा तपास व्हावा अशी मागणी मी स्वतःच केली आहे.

माझ्या मुलीने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार पगार घेतला आहे. मला 2024 च्या निवडणुकीत अडचणीत आणण्याचा हेतूने हे कुणीतरी केलंय. त्याआधीच माझ्या मंत्रिपदाचा विषय आला, आणि त्याच वेळी हा विषय पुढे आला, असेही ते म्हणाले.

‘त्या’ वेळी किती खोके घेतले?
शेतकर्‍यांच्या मुलाने मंत्री, मुख्यमंत्री होऊ नये का? आधीचे उद्योगमंत्री सुभाष देसाई आमच्या औरंगाबादचे पालकमंत्री होते. त्यांनी उद्योगासाठी काय केलं? आमचा तर ते राम- रामही नीटपणे स्वीकारत नव्हते. त्यामुळे आदित्य ठाकरे आज जे बोलतात त्याबद्दल त्यांनी आत्मपरीक्षण करावे. आम्हाला बाप पळवणारी टोळी म्हणतात. त्यांनी महविकास आघाडीसोबत आमदार चोरून नेलं. आम्हाला खोके घेतले म्हणता, मग त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करताना किती खोके घेतले, असा सवाल सत्तार यांनी केला.

Back to top button