निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्यास तुम्ही का धजावत आहात : अर्थमंत्री सीतारामण यांची उद्योजकांना विचारणा | पुढारी

निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्यास तुम्ही का धजावत आहात : अर्थमंत्री सीतारामण यांची उद्योजकांना विचारणा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भारतात गुंतवणूक करण्याची मोठी संधी असल्याचे तमाम विदेशी गुंतवणूकदार मानतात;  मग तुम्हीच का मागे आहात. निर्मिती क्षेत्रात व्यापक प्रमाणात गुंतवणूक का करीत नाही, की हनुमानाप्रमाणे तुम्हाला तुमच्या शक्तीची जाणीव नाही. जगभरातले गुंतवणूकदार भारतात गुंतवणूक करीत असल्याचे विदेशी चलनसाठा आणि विदेशी गुंतवणुकीचा ओघ दिसून येत आहे; मग देशाच्या निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्यास तुम्ही का धजावत आहात, असा सवाल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी भारतीय उद्योजक आणि गुंतवणुकदारांना केला.

2019 साली मी अर्थमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला, तेव्हा गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण नव्हते, तसेच करांचे प्रमाण कमी करा, अशा गोष्टी ऐकायला मिळाल्या. त्यानंतर सरकारने वातावरण पोषक करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्‍या आहेत. उत्पादनावर आधारित सवलत अर्थात पीएलआय योजना आणण्यात आली, करांचे दर कमी करण्यात आले. मात्र असे असूनही निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्यास उद्योजक व गुंतवणूकदार धजत आहेत. यामागचे कारण जाणून घेण्याची माझी इच्छा आहे, असेही त्‍या म्‍हणाल्‍या,.

निर्मिती क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने ऑटोमोबाईल, ऑटो कांपोनंटसहित १४ उद्योगांकरिता पीएलआय योजना सुरु केल्याची माहिती सीतारामण यांनी दिली. पुढील काळ हा उदयोगासाठी भारताचा आहे असे सांगून त्या पुढे म्हणाल्या की, कोणतेही धोरण हे कायमचे नसते, त्यात बदल होत असतात. विदेशी उद्योजक आणि गुंतवणूकदार जर भारताच्या पोषक वातावरणाचा लाभ घेत आहेत, तर भारतीय उद्योजक आणि गुंतवणुकदारांनी मागे राहू नये, असे आवाहनही त्‍यांनी केले.

हेही वाचा : 

Back to top button