उत्तर पुणे जिल्ह्यात लम्पीचा शिरकाव, अतिदुर्गम आदिवासी भागातील जनावरांचे लसीकरण | पुढारी

उत्तर पुणे जिल्ह्यात लम्पीचा शिरकाव, अतिदुर्गम आदिवासी भागातील जनावरांचे लसीकरण

ओतूर, पुढारी वृत्तसेवा: उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असलेल्या अतिदुर्गम आदिवासी भागातील कोपरे, मांडवे, मुथाळणे, जांभुळशीसह मांडवी नदीच्या खोर्‍यात पशुधनात लम्पी रोगाने शिरकाव केला आहे. परिसरातील पशुधनाचा बचाव करण्यासाठी प्रशासनाकडून लसीकरण मोहीम राबविण्यात आल्याची माहिती जुन्नर पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. महेश शेजाळ यांनी दिली.

जांभुळशी या आदिवासी गावातील जनावरांची तपासणी करताना 7 बैल व एका गायीला लम्पीचा संसर्ग झाल्याचे आढळले. त्यामुळे पशुधन विभाग अलर्ट झाला आणि शुक्रवार (दि. 9), तसेच शनिवार (दि. 10) या दोन दिवसांत या आदिवासी भागात पशुवैद्यकीय कर्मचार्‍यांच्या 9 पथकांद्वारे वाड्या-वस्त्यांवरील 1 हजार 234 पेक्षा अधिक जनावरांचे लसीकरण करण्यात आले. दुसऱ्या एका पथकाद्वारे बाधित 7 बैल व एका गाईवर औषधोपचार करण्यात येत आहे.

मांडवे गावातील अनिल बुळे, सखाराम दाभाडे, विठ्ठल बुळे, मधुकर दाभाडे, नामदेव दाभाडे, दगडू उंबरे व शंकर दाभाडे या आदिवासी शेतकरी बांधवांच्या बैलांना तर कोपरे येथील चंद्रकांत मुठे यांच्या गायीला लम्पी रोगाने ग्रासले आहे. मांडवे (ता. जुन्नर) येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-2 अंतर्गत येणार्‍या गावातील जनावरांना लम्पी या रोगाची लागण झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ताबडतोब प्रशासनाकडून दखल घेतली गेली व जनावरांना उपचारार्थ लागणारे टॉनिक व जखमेवर लावण्यात येणारे मलमदेखील मोफत दिली जात आहेत.

कोपरे, मांडवे या अतिदुर्गम आदिवासी भागात संसर्गजन्य लम्पीची लागण झाल्याचे समजताच महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह, अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे यांनी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-2 मांडवे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन निरीक्षण केले. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी शिवाजी विधाटे, जुन्नर पंचायत समितीचे पशुधन विकास विस्तार अधिकारी डॉ. महेश शेजाळ आणि जुन्नर तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Back to top button