पुणे: वीजचोरी पडली चांगलीच महागात, आरोपीला एक वर्षाचा तुरुंगवास | पुढारी

पुणे: वीजचोरी पडली चांगलीच महागात, आरोपीला एक वर्षाचा तुरुंगवास

पुणे, पुढारी वृत्तसेवा: कोल्हापूर जिल्ह्यातील ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथील एका लघुदाब औद्योगिक ग्राहकास वीजचोरी करणे चांगलेच महागात पडले आहे. वीजचोरीप्रकरणी भाऊराव संभाजी पाटील (वय 40) यांना गडहिंग्लज न्यायालयाने एका वर्षाच्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे. या ग्राहकाने वीजमीटरमध्ये छेडछाड करून 24 हजार 675 वीज युनिटची, आर्थिक मूल्याप्रमाणे 2 लाख 50 हजार रुपयांची वीजचोरी केली होती.

19 नोव्हेंबर 2015 रोजी ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथील वीजग्राहक भाऊराव संभाजी पाटील यांचे सातेरी राईस मिलच्या वीजमीटरची पंचासमक्ष घटनास्थळी तपासणी करण्यात आली होती. प्रथमदर्शनी वीज मीटरचे पीव्हीसी सील तुटलेले व स्टिकर सील संशयास्पद स्थितीत आढळून आले. क्युचेक यंत्राच्या सहाय्याने वीज मीटर तपासणी केली. या तपासणीत वीजमीटर संथ गतीने फिरत असल्याचा निष्कर्ष नोंदविण्यात आला. पंच व ग्राहकासमक्ष सक्षम अधिकारी यांनी वीज मीटर सील केले. सदर वीज मीटरची गडहिंग्लज येथे 20 नोव्हेंबर 2015 रोजी वीजभार तपासणी करून पंचनामा करण्यात आला. या वीजभार तपासणीत वीजमीटर 75.94 टक्के संथ गतीने फिरत असल्याचे आढळून आले. पुन्हा पंच व ग्राहकासमक्ष सक्षम अधिकारी यांनी वीज मीटर सील केले. 21 नोव्हेंबर 2015 रोजी कोल्हापूर येथील वीज तपासणी प्रयोगशाळेत ग्राहकासमक्ष वीज मीटर तपासले. या तपासणीत वीज मीटरमध्ये वीज वापर कमी नोंदवला जावा, अशा पध्दतीने फेरफार केल्याचे सिद्ध झाले.

ग्राहकाने सदरील वीजचोरीच्या 22 फेब्रुवारी 2014 ते 19 नोव्हेंबर 2015 या निर्धारित 19 महिने कालावधीत 24 हजार 675 युनिटची वीजचोरी केली आहे. ग्राहकास वीजचोरीच्या युनिटचे आर्थिक मुल्यानुसार रु. 2 लाख 50 हजार व तडजोडीचे रक्कम रु. 1 लाख 50 हजार इतके बिल देण्यात आले होते. मात्र, नोटीस देऊनही ग्राहकाने वीजबिल भरले नसल्याने महावितरणच्या फिर्यादीनुसार विद्युत कायदा 2003 कलम 135 व 138 अन्वये भाऊराव संभाजी पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी झालेल्या सुनावणीत गडहिंग्लज न्यायालयाने आरोपीस एक वर्षाची साधी कैद व 10 हजार रुपये दंडाची, दंड न भरल्यास एक महिन्याची साधी कैद ही शिक्षा ठोठावली आहे.

Back to top button