बारामतीत घड्याळ बंद पाडणार : चंद्रशेखर बावनकुळे यांचा नाशिकमध्ये निर्धार | पुढारी

बारामतीत घड्याळ बंद पाडणार : चंद्रशेखर बावनकुळे यांचा नाशिकमध्ये निर्धार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भाजपने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून, राज्यातील १६ मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामध्ये बारामतीचा समावेश आहे. मी नुसती बारामतीला भेट देणार म्हटल्याबरोबर पवार कुटुंबाने धास्ती घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी माझी कुळे काढली. परंतु, २०२४ ला बारामतीत घड्याळ बंद पाडणार, असा निर्धार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी व्यक्त केला. नाशिकमधील रखडलेल्या प्रकल्पांबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर बावनकुळे हे रविवारी (दि.११) प्रथमच नाशिक दौऱ्यावर आले. यावेळी राज्यातील राजकीय घडामोडींसह नाशिकमधील रखडलेल्या प्रकल्पांबद्दल त्यांनी पत्रकारांसोबत चर्चा केली. ते पुढे म्हणाले की, प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर राज्याचा दौरा करत असून, त्यानिमित्ताने २०२४ च्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पक्षाने राज्यातील १६ मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करत त्यांची जबाबदारी केंद्रातील मंत्र्यांवर सोपविली आहे. मंत्री दर तीन महिन्यांनी म्हणजेच १८ महिन्यांत सहा वेळा त्या मतदारसंघांचा दौरा करणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली.

राज्यातील १६ लोकसभा मतदारसंघांत बारामतीचा समावेश आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर या मतदारसंघाची जबाबदारी असून, २०२४ ला खासदार शरद पवार यांचा हा गड आम्ही सर करणार, असा आत्मविश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. बारामती शहराचा विकास केला म्हणजे पवार कुटुंबाने उपकार केलेले नाहीत. तसे असल्यास बारामती मतदारसंघातील दौंड, पुरंदर, हडपसरचा विकास का होऊ शकला नाही, असा सवालही बावनकुळे यांनी उपस्थित केला. जानेवारी २०२३ ते २०२४ या काळात राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांचा दाैरा करणार असून, शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वात विधानसभेत २०० आमदार निवडून आणणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

नाशिकमधील आगामी कुंभमेळा नियाेजन, मेट्रो रेल्वे, आयटी व लॉजिस्टक पार्क, स्मार्ट सिटी, नमामि गोदा, ओझर विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू करणे आदी प्रकल्पांबाबत बावनकुळे यांचे लक्ष वेधण्यात आले. त्यावर नाशिककरांचे जिव्हाळ्याचे विषय शासनाकडे मांडून त्याचा पाठपुरावा करू, असे त्यांनी सांगितले. मनसेशी युतीसंदर्भात कोणतीच चर्चा नसल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. राज्यात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी शिवसेनेच्या शिंदे व ठाकरे गटाने रस्त्यावरील लढाई थांबवावी. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या समर्थकांना समजावून सांगावे, अशी विनंती बावनकुळे यांनी केली.

शिंदे गटाला पाठबळ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांवर गद्दारीचा आरोप होत असून, मुळात ते गद्दार नाहीत. तर, ठाकरे गटच गद्दार असल्याची जळजळीत टीका बावनकुळे यांनी केली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये जेथे शिवसेनेच्या शिंदे गटाचा प्रबळ उमेदवार उभा असेल तेथे भाजप पूर्ण ताकदीनिशी पाठबळ देऊन काँग्रेस, राष्ट्रवादीला विजयापासून दूर ठेवण्यात येईल. दाेन दिवसांमध्ये राज्यातील पालकमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली जाईल. मात्र, मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील रखडलेल्या विस्ताराबाबतचे अधिकार हे सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचे असल्याचे सांगत त्यांनी अधिकचे भाष्य टाळले.

चव्हाणांना वाईट वागणूक

काँग्रेसमधील चुकीच्या गोष्टींवर भाष्य करणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांना पक्षात वाईट वागणूक मिळत असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. विधानसभेत त्यांना चौथ्या रांगेत स्थान दिल्याचे सांगतानाच पक्षांतर्गत चुकीच्या बाबींवर भाष्य करणे म्हणजे भाजपच्या संपर्कात असणे हाेत नाही. भाजपची दारे सर्वांसाठी खुली असल्याचे स्पष्ट करताना माजी मंत्री अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाबद्दल त्यांनी इन्कार केला.

नाना पटोले बावचळले

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पक्षात स्थान नाही. सत्ता गेल्याने ते बावचळले असल्याने काहीही विधाने करीत आहेत, अशी टीका बावनकुळे यांनी केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पटोलेंनी काँग्रेसमध्ये येण्याच्या निमंत्रणाकडे लक्ष वेधले असता ना. गडकरी हे भाजप सोडणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंकजा मुंडे यांच्याशी दररोज चर्चा होत असून, त्याही पक्षावर कुठे नाराज नसल्याची स्पष्टोक्ती बावनकुळे यांनी दिली.

हेही वाचा :

Back to top button