कोल्हापूर : बाजार समितीत दोन्ही काँग्रेसला भाजपचे आव्हान | पुढारी

कोल्हापूर : बाजार समितीत दोन्ही काँग्रेसला भाजपचे आव्हान

कोल्हापूर ; डी. बी. चव्हाण : राज्यातील सत्तांतराचे पडसाद जिल्ह्याच्या राजकारणावरही उमटले आहेत. त्याचे पडसाद शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पडण्याची शक्यता आहे. सध्या सेवा संस्था गटात राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे; मात्र ग्रामपंचायती गट, व्यापारी, अडते, हमाल या गटात शिंदे गट-भाजपचे वर्चस्व आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला या निवडणुकीत झुंजावे लागणार आहे.

शेतकर्‍यांना मतदानाचा हक्क देण्यासाठी राज्यातील शिंदे गट व भाजपचे सरकार ठाम आहे; मात्र जुन्या म्हणजे सेवा सोसायटी संचालक व ग्रामपंचायत सदस्य या पद्धतीने मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीची 2015 मधील निवडणूक तिरंगी झाली होती. त्यात आ. हसन मुश्रीफ, आ. सतेज पाटील, आ. विनय कोरे व माजी आ. संपतराव पवार-पाटील यांच्या नेतृत्वाखालील विकास आघाडी. आ. पी. एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक यांची शाहू आघाडी व खा. संजय मंडलिक, चंद्रदीप नरके, राजू शेट्टी यांच्या परिवर्तन आघाडीत लढाई झाली होती.

यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी व जनसुराज्यने 19 पैकी 16 जागा जिंकून बाजार समितीवर निर्विवाद वर्चस्व मिळविले. त्यावेळी राज्यात भाजपची सत्ता होती. त्यामुळे भाजपने आपल्या तीन सदस्यांना शासन नियुक्त सदस्य म्हणून बाजार समितीवर पाठवून आपला दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

नोकर भरतीमुळे संचालक मंडळ बरखास्त

गेल्या पाच वर्षांत बाजार समितीतील गैरव्यवहारावराची अनेक प्रकरणे उघडकीस आली. त्यात बेकायदा नोकर भरती हा विषय गाजला. परिणामी, बाजार समितीतील काँग्रेस-राष्ट्रवादीप्रणीत सत्तारूढ संचालक मंडळ बरखास्त झाले. त्यानंतर ऑगस्ट 2020 मध्ये अशासकीय प्रशासक मंडळ सत्तेवर आले. सहा महिन्यांसाठी आलेले हे मंडळ 18 महिने सत्तेवर होते; पण पुढील मुदतवाढ मिळाली नाही म्हणून हे मंडळ कमी झाले आहे.

तुल्यबळ लढतीचे संकेत

सध्या जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकत्र आहेत. राज्यात भाजपसोबत असणारे आ. विनय कोरे हे स्थानिक सहकारी संस्थांच्या राजकारणात मात्र काँगे्रस व राष्ट्रवादीसोबत आहेत. आ. प्रकाश आवाडेही त्यांच्यासोबत होते. परंतु, जिल्हा बँकेच्या निवडणुकीपासून ते त्यांच्यापासून चार हात लांबच आहेत. जिल्ह्यातील शिवसेनेचे खा. संजय मंडलिक, आ. प्रकाश आबिटकर हे सध्या शिंदे गटात आहेत. धनंजय महाडिक भाजपकडून राज्यसभेचे सदस्य झाल्यामुळे महाडिक गटाची ताकद आता वाढली आहे. त्यामुळे ते देखील या निवडणुकीत ताकदीने उतरणार असल्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीत अतिशय चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.

Back to top button