वेल्हा वगळून सर्व तालुक्यांत ‘लम्पी’; चार जनावरांचा मृत्यू | पुढारी

वेल्हा वगळून सर्व तालुक्यांत ‘लम्पी’; चार जनावरांचा मृत्यू

पुणे; पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यातील बारा तालुक्यांत ‘लम्पी स्किन’चा शिरकाव झाला आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी पुणे जिल्ह्यासाठी रविवारी एक लाख 63 हजार लस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 71 जनावारांना लम्पी स्किनची लागण झाली आहे, तर 4 जनावरांचा त्यामध्ये मृत्यू झाला आहे. ज्या गावांत लम्पी स्किनचा प्रादुर्भाव झाला त्या गावांमध्ये अधिक काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे यांनी सांगितले.

रविवारी पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते लसीचे तालुक्यांना वाटप करण्यात आले. जनावरांची जीवित हानी टाळण्यासाठी प्रभावी उपचार केले जात आहेत. प्रादुर्भाव असलेल्या गावांमध्ये शिबिरे उभारण्यासाठी महाविद्यालयांशी समन्वय साधणे, 24 तास देखरेखीसाठी अतिरिक्त सरकारी डॉक्टर आणि पशुधन पर्यवेक्षक तैनात केले आहेत. या आजाराच्या विषाणूचा संसर्ग निरोगी व बाधित जनावरे यांच्यातील स्पर्शाने होतो, असेही डॉ. विधाटे यांनी सांगितले.

कार्यालयातील डॉक्टर फिल्डवर
जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये पशुसंवर्धन विभागात काही डॉक्टरांकडे प्रशासकीय कामांची जबाबदारी आहे. त्या सर्व डॉक्टरांना फिल्डवर पाठविण्यात आले आहे. लम्पी स्किनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डॉक्टरांची कमतरता भासत आहे, जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धनच्या काही दवाखान्यांत डॉक्टरच्या जागा रिक्त आहेत, अशा दवाखान्यात या डॉक्टरांना नियुक्त करण्यात आल्याचे डॉ. विधाटे यांनी सांगितले.

Back to top button