विनायक मेटे यांचा अपघात नेमका कसा झाला?; महत्वाची माहिती आली समोर | पुढारी

विनायक मेटे यांचा अपघात नेमका कसा झाला?; महत्वाची माहिती आली समोर

पनवेल; विक्रम बाबर : शिवसंग्राम संघटनेचे नेते माजी आमदार विनायक मेटे यांचे मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात निधन झाले. हा अपघात रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मांडप बोगद्याजवळ किमी नंबर १५/९०० या ठिकाणी झाला. या घटनेची माहिती मिळताच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्षनेते अजित पवार, शरद पवार, चंद्रकांत पाटील, रवींद्र चव्हाण, प्रवीण दरेकर, प्रशांत ठाकूर, निरंजन डावखरे, महेश बालदी यांनी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी मेटे कुटुंबियांची भेट घेऊन शोक व्यक्त केला. या अपघाताची संपूर्ण चौकशी होईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

आज (रविवार) सकाळी मराठा समाजाच्या बैठकीसाठी मेटे मुंबईत येत होते. त्याबाबत मेटे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोबाईलवर मेसेज पाठवल्याचे फडणवीस यांनी सांगितले. मात्र सकाळी मेटे यांच्या वाहनाचा एक्स्प्रेस वे वर अपघात झाल्याची माहिती मिळाली. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी यांना एमजीएम रूग्णालयात पाठवले. मात्र मेटे यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती हाती पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजासाठी लढणारा नेता हरपला अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. या अपघाताची चौकशी केली जाणार असल्याचे ही स्पष्ट केले. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेले दहा वर्षे एकत्र असल्याचे सांगितले.

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे आणि शिवसंग्राम पक्षप्रमूख विनायक मेटे हे त्यांच्या इंडिव्हर गाडी क्रमांक एम एच- 01, डीपी-6364 मधून मुंबईच्या दिशेने जात होते. पहाटे पाचच्या सुमारास किमी नंबर १५/९०० या ठिकाणी त्यांच्या गाडीवरील चालकाचा ताबा सुटला आणि त्यांच्या पुढे जाणाऱ्या अज्ञात वाहनाला ठोकर बसून अपघात झाला. या अपघातात ते गंभीररित्या जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांचे बॉडीगार्ड राम ढोबळे हे सुद्धा गंभीर जखमी झाले असून त्याचा गाडीचालक एकनाथ कारभारी कदम हा जखमी झाला आहे. त्यांच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, विनायक मेटे यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. विनायक मेटे यांच्या गाडीची स्थिती पाहून अपघात किती गंभीर आहे याची प्रचिती येत होती. मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर मुंबईच्या दिशेने मेटे येत असताना पनवेल ते खालापूर दरम्यानच्या मांडप बोगद्याजवळ हा अपघात घडला. पुढे जाणाऱ्या गाडीला मेटे यांच्या गाडीने जोरात धडक दिली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गाडीच्या डाव्या बाजूचा भाग चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर मेटे यांना एक तासभर कुणाचीही मदत मिळाली नाही. त्यानंतर त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल केले होते. मेटे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्या या अपघाताची माहिती समजल्यानंतर त्यांची पत्नी व मुलगी तसेच नातेवाईकांनी एमजीएम रुग्णलयात धाव घेतली. त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत बाळासाहेब पाटील, खासदार उदयनराजे भोसले, संभाजीराजे छत्रपती, मराठा समन्वयक समितीचे विनोद साबळे, गणेश कडू, केरे पाटील, आबा पाटील, अविनाश पाटील, प्रीतम म्हात्रे यांनी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयाला भेट दिली. त्यानंतर पनवेल उपजिल्हा रुग्णालयात मेटे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता. सदर मृतदेह हा मुंबई वडाळा येथे त्याच्या नातेवाईकामार्फत नेण्यात आला. दरम्यान, सदर गाडीवरील चालक कदम यांना रसायनी पोलिसांनी जवाब नोंदवण्यासंदर्भात ताब्यात घेतले आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सात्यत्याने संघर्ष करणारा नेता आज आपल्यातून हरपला आहे. शासन त्याच्या परिवारासोबत आहे. या अपघाताच्या सर्व बाबी तपासून घेण्यात येणार आहोत.

-एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

संघर्षशील नेतृत्व, गरिबीतून वर येऊन उभे राहिलेले नेतृत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे पहात असू. मराठा आरक्षणासाठी त्याचा प्रचंड अभ्यास होता. त्यासाठी त्यांनी लढा दिला व पाठपुरावा केला.

देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

आजची पहाट दुःखद घटनेने सुरु झाली. जवळचा सहकारी, मराठवाड्याचा सुपूत्र, सामाजिक बांधिलकी बाबतीत जाण असणारे व्यक्तिमत्व, मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी झटणारा नेता हरपला आहे.

अजित पवार,  विरोधी पक्षनेते

शेतकरी, शेती या प्रश्नावर अभ्यास असलेला नेता, २० ते २५ वर्ष मराठा समाज आरक्षणासाठी जनमत निर्माण करणारा नेता आपल्यातून निघून गेला आहे. ज्या कामासाठी त्यांनी संघर्ष व आग्रह केला त्या कामाच्या पूर्ततेसाठी सगळ्यांनी सहकार्य करून त्या कामाची पूर्तता करणे गरजेचे आहे. हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल.

शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी

विनायक मेटे यांच्या अतिशय धक्कादायक अशा अपघाती निधनाच्या बातमीने धक्का बसला. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये, मराठवाड्यामध्ये एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या व अत्यंत कष्टाने आपले स्वतंत्र व्यक्तिमत्व आणि नेतृत्व विकसित केलेला नेता असा विनायक मेटे यांचा परिचय महाराष्ट्राला होता.

ते राजकीय कार्यकर्ते कमी पण सामाजिक कार्यकर्ते अधिक होते. मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या हिताचा प्रश्न असेल किंवा नव्या पिढीच्या शैक्षणिक सवलतींचा प्रश्न असेल अशा सगळ्या कामांमध्ये अत्यंत बारकाईने व अभ्यासूपणाने व्यक्त होणारे ते व्यक्तिमत्व होते. शिवछत्रपतींचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक मुंबईच्या समुद्रामध्ये व्हावे यासाठी त्यांनी कष्ट घेतले. त्यांच्या आकस्मिक अपघाती निधनाने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातल्या एका मोठ्या सामाजिक नेतृत्वाला आज आपण मुकलो. मी माझ्या वतीने या दुःखामध्ये सहभागी आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि हजारो कार्यकर्त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली!

राजकुमार पाटील, राष्ट्रवादी नेते

 

Back to top button