विनायक मेटे लढवय्या नेतृत्व; बांधकाम मजूर ते ५ वेळा आमदार असा प्रेरणादायी प्रवास | पुढारी

विनायक मेटे लढवय्या नेतृत्व; बांधकाम मजूर ते ५ वेळा आमदार असा प्रेरणादायी प्रवास

बीड; पुढारी वृत्तसेवा : अतिशय सामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आलेले विनायक मेटे एक लढवय्या नेते होते. सामाजिक आणि समाजाभिमुख कामांसाठी ते कायम पुढे असायचे. अनेक चळवळी सुरू करून त्यांनी संघर्ष केला. आज त्यांचे निधन झाल्याने मराठा समाजासाठी झगडणारा नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे.

केज तालुक्यातील राजेगाव येथे गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेले विनायक मेटे एक कामगार म्हणून मुंबईला गेले. सुरूवातीच्या काळात त्यांनी खूप संघर्ष केला. बांधकाम मजूर, घरांना रंग देणे अशी छोटी-छोटी कामे त्यांनी केली. या काळात अण्णासाहेब पाटील यांच्याशी त्यांचा संपर्क आला आणि त्यांनी विनायक मेटे यांच्यातील नेतृत्व गुण ओळखले. मराठा महासंघाच्या चळवळीत त्यांनी प्रभावी काम केले. मराठा सामाजासाठीची तळमळ, त्यांचे संघटन कौशल्य, आक्रमकपणा पाहून विनायक मेटे यांना भाजपाचे तत्कालीन नेते गोपीनाथ मुंडे यांनी विधान परिषदेवर संधी दिली. यानंतर विनायक मेटे यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. मराठा सामाजासाठी कायम रस्त्यावर उतरून त्यांनी संघर्ष केला. अनेक चळवळींना त्यांनी जन्म दिला. मराठा आरक्षण प्रश्‍नाचे राज्यपातळीवर नेतृत्व केले. गेल्या अनेक वर्षापासून विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्‍न लावून धरला होता. आरबी समुद्रात छत्रपती शिवरायांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी देखील विनायक मेटे यांनी संघर्ष केला. मराठा आरक्षणासाठी लढत असतानाच ओबीसींवर देखील अन्याय होऊ नये, ही त्यांची भुमीका होती. बीडच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात विनायक मेटे यांनी विविध जाती- धर्मातील हजारो कार्यकर्त्यांना शिवसंग्राम संघटनेच्या माध्यमातून सोबत घेतले होते. विनायक मेटे हे कायम सत्तेच्या वलयात होते. मात्र सत्तेच्या वलयात असूनही त्यांनी नेहमी मराठा समाजाच्या प्रश्‍नांवर संघर्षाची भूमिका घेतली.

सामुदायिक विवाहाची चळवळ उभी केली

विनायकराव मेटे यांनी बीडमध्ये सामुदायिक विवाह सोहळ्याची चळवळ उभा केली. प्रत्येकवर्षी ते सामुदायिक विवाह सोहळा घेऊन शेकडो दाम्पत्यांचा विवाह करायचे. हजारो गरीब कुटुंबातील तरूण-तरूणींचा त्यांनी सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह केले.

व्यसनमुक्तीची चळवळ उभारली

विनायक मेटे यांनी बीडमध्ये व्यसनमुक्तीची चळवळ उभा केली. तरूणांनी व्यसनापासून दूर राहिले पाहिजे. यासाठी ते मागील काही वर्षांपासून बीड येथे 31 डिसेंबर रोजी व्यसनमुक्तीचा भव्य कार्यक्रम घ्यायचे. व्यसनमुक्ती चळवळीत काम करणार्‍या लोकांचा त्यांनी गौरव केला. त्यांच्या व्यसनमुक्ती अभियानाला मोठा प्रतिसाद मिळाला होता.

हेहा वाचा : 

Back to top button