ENGvsIND : विराट कोहलीला लीड्स कसोटीने घडवली अद्दल

virat kohli www.pudhari.com
virat kohli www.pudhari.com
Published on
Updated on

लीड्स कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर (ENGvsIND) विराट कोहली आनंदाने मैदान सोडताना दिसला. टीम इंडिसाठी लीड्स कसोटीतील तोच एक समाधानाचा क्षण ठरला. चौथ्या दिवसाची भारतीय चाहते मोठ्या अपेक्षेणे वाट पाहत होते. कारण त्यांना विराट सेना २००२ मधील इतिहासाची पुरनावृत्ती करणार आहे असा गाढा विश्वास होता.

मात्र चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाला आणि भारतीय प्रेक्षकांची उत्सुकता निराशेत बदलली. ज्याच्या शतकाची सर्वचजण चातकासारखी वाट पाहत होते तो पुजारा कालच्याच ९१ धावांवर बाद झाला. सर्वांच्याच मनातील शंकेची पाल चुकचुकली.

अँडरसनला चाचपडणारा 'आक्रमक' विराट

पण, खेळपट्टीवर अजूनही विराट कोहली होता त्यामुळे सर्व चाहते पुजाराच्या दुःखातून सावरत टीव्हीकडे डोळे लावून बसले. विराटचा वैरी अँडरसन नवीन चेंडूवर विराटचा ऑफ स्टम्पच्या बाहेर सारखा पाळणा हलवत होता. त्यामुळे भारतीय चाहत्यांचा बीपी चेंडूगणिक हाय होत होता. दरम्यान विराट विरुद्ध दोन अपिल झाल्या होत्या, त्यात तो थोडक्यात बचावला होता.

विराट कोहलीने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र या अर्धशतकाचा आनंद फार काळ टिकला नाही. ऑली रॉबिन्सनने त्याला ऑफ स्टम्पच्या बाहेर जाणारा आऊट स्विंग टाकला आणि आपल्या हट्टी विराट बाळाने तो खेळला. तो चेंडू विराटच्या बॅटची कडा घेऊन रुटच्या हातात विसावला आणि भारताच्या ड्रेसिंगरुमवर पराभवाचे ढग गडद झाले.

विराट कोहली पुन्हा एकदा त्याच स्टाईलमध्ये बाद झाला. तो बाद होताच सुनिल गावसकरांचे शब्द आठवले. 'आता बस झालं.. विराटने त्वरित सचिन तेंडुलकरला फोन करुन काय चुकत आहे हे विचारण्याची गरज आहे.' पण, विराटने जरी तेंडुलकरला फोन केला तरी त्याच्यात सुधारणा होईल का?

तेंडुलकरसारखे बलिदान जमणार का?

सचिन तेंडुलकरही विराट सारखाच सातत्याने एकाच प्राकारे बाद होता होता. सचिन तेंडुलकरची स्ट्रेट ड्रईव्ह बरोबरच ऑफ स्टम्प आणि मिडल स्टम्पवर पडलेला चेंडू फ्लिक करण्यात महारत होती. मात्र त्याच्या कारकिर्दित असा क्षण आला की तो हा फ्लिक शॉट खेळताना सातत्याने बाद होऊ लागला.

हा फटका खेळताना त्याच्या बॅट आणि पॅडमध्ये मोठा गॅप निर्माण होत होता. याचाच फायदा जगभरातील गोलंदाज घेऊ लागले. सातत्याने फ्लिकवर बाद होत असलेल्या सचिन तेंडुलकरने तो आवडता फटका खेळण्यावर नियंत्रण आणले. विराट सध्या अशाच फेजमधून जात आहे. त्याला ऑफ स्टम्पच्या बाहेरचा चेंडू ड्रईव्ह करण्याचा मोह आवरत नाही.

मात्र हाच फटका मारताना तो इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसारख्या वेगवान गोलंदाजांना साथ देणाऱ्या देशात त्याच्यासाठी अवघड जागेचे दुखणे झाले आहे. आता हट्टी विराट कोहली तेंडुलकरसारखे हा फटका जोपर्यंत चेंडू स्विंग होत आहे तोपर्यंत न खेळण्याचे पथ्य पाळणार का?

विराटची ऑफ स्टम्पच्या बाहेर लाळ टपकते ( ENGvsIND ) 

विराट कोहली ऑफ स्टम्प बाहेरचा चेंडू खेळून बाद होतो हे आता गल्लीतील शेंबडं पोरगं ही सांगेल. याच्यावर सोपा उपाय काय तर तो चेंडू विकेट सोडूनच जात आहे. मग त्याला त्याच्या मार्गाने जाऊ द्यावे उगाच त्याला टोलावण्याचा अट्टाहस करु नये. हा उपाय कोणताही क्लब स्तरावरील खेळाडू देखील सांगेल.

एवढा सोपा सल्ला विराट कोहलीच्या कानात का शिरत नाही. तर याला कारण म्हणजे विराट कोहलीचा आक्रमकतेचा बालहट्ट. विराट कोहलीला यापूर्वीही अनेकदा वरिष्ठ खेळाडूंनी विराटला कसोटीत प्रत्येक वेळी आक्रमक असणे संयुक्तिक नसते हे सांगितले आहे. मात्र विराटच तो ऐकेल कसा?

पण, या हट्टी विराट कोहलीला लीड्स कसोटीनेच अद्दल घडवली. पहिल्या डावात नाणेफेक जिंकून त्याने फलंदाजी घेतली. खेळपट्टी तशी फलंदाजीला पोषकच होती. मात्र विराट कोहलीचा ड्रेसिंग रुममध्ये दंडक आहे की सर्वांनी आक्रमकपणे आणि धावा करण्याच्या इराद्यानेच फलंदाजी करायची. तशी फलंदाजी संघाने केली आणि धावफलकावर लागल्या ७८ धावा.

इशांत आता पिकलं पान हे कधी कळणार? ( ENGvsIND ) 

हा इंग्रजांच्या मायभूमीत झालेला हा टीम इंडियाचा अपमान गोलंदाज धुवून काढतील अशी अपेक्षा होती. लॉर्ड्सवर तर त्यांनी इंग्रजांना यमुनेचे पाणीच पाजले होते. मात्र तसे काही घडले नाही. कारण आपण एकाच धाडणीचे वेगवान गोलंदाज घेऊन खेळलो. या वेगवान गोलंदाजांना हवेत स्विंग करण्यात अडचणी येतात.

इशांत शर्मा तर पिकलं पान आहे. पण, या पिकलेल्या पानावर सट्टा लावण्यात विराटला मोठी धन्यता वाटते. या इशांत शर्मानेच लीड्स कसोटीत घात केला. पहिल्या कसोटीत शार्दुल ठाकूरने मोक्याच्या क्षणी भारताला विकेट मिळवून दिली होती. त्याने गेल्या काही काळात पार्टनरशिप ब्रेकर म्हणून आपली ओळख तयार केली होती.

मात्र त्याला लॉर्ड्सवर कट्टा दाखवण्यात आला. लीड्सवरही त्याच्यावर विराट कोहली दया दाखवू शकला नाही. त्याला हाच हट्टीपणा आणि वेग, बाऊन्सचे प्रेम लीड्स कसोटीत महागात पडले. लॉर्ड्स कसोटी १५१ धावांनी जिंकणार लीड्स कसोटीत भारत एक डाव आणि ७६ धावांनी पराभूत झाला. पहिल्या दोन कसोटीत इंग्रजांच्या छाताडावर नाचणाऱ्या भारत बॅकफूटवर आला. आता तरी विराट कोहली अवाजवी आक्रमकता आणि अतार्किक संघ निवडीचा बालहट्ट सोडणार की हा बालहट्ट मालिका गमावूनच स्वस्थ बसणार!

लीड्सने विराट कोहलीला चांगलीच अद्दल घडवली आहे. आता या चुकांमधून विराट शिकणार की आपला हट्टीपणा सोडणार नाही हे आता येता काळच ठरवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news