

बारामती; पुढारी वृत्तसेवा : कडक आणि शिस्तप्रिय स्वभावामुळे राज्यात ओळख असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (दि. २८) बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्रमात एका कॅमेरामनला फटकारले. 'आता बघा या पठ्ठ्याने मास्क लावलेला नाही. शुटिंग घेतोय. अरे तुझा मास्क कुठेय, का सांगू पोलिसांना उचलायला', या भाषेत पवार यांनी कॅमेरामनची हजेरी घेतली.
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जळोची (ता. बारामती, जि. पुणे) उपबाजारात मॅग्नेट प्रकल्पांतर्गत राज्यातील पहिल्या फळे व भाजीपाला हाताळणी केंद्राचे भूमीपूजन पार पडले. सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यावेळी उपस्थित होते. पवार यांनी यावेळी आपला रोखठोक स्वभाव दाखवून दिला.
पवार म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला आपण सामोरे गेलो. आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आपण सर्वांनी स्वतःसह कुटुंबाची, समाजाची काळजी घेणे गरजेचे बनले आहे. यावेळी त्यांची नजर समोर लावलेले कॅमेरे अन कॅमेरामनकडे गेली. त्यातील एकाने मास्क घातलेला नव्हता. त्यावर पवार यांनी त्याला फटकारले.
'आता बघा या पठ्ठ्याने मास्कच लावला नाही. शुटींग घेतोय. मास्क कुठेय… आता सांगू का पोलिसांना उचलायला. पुन्हा म्हणाल, हा दादा लय कडक आहे. तु मास्क न लावल्याने तुझ्या शेजारच्याला कोरोना व्हायचा. आम्ही काय आमच्या स्वतःसाठी सांगत नाही. समाजाचे हित साधणे हे आमचे कर्तव्य आहे. म्हणून प्रत्येकाने मास्क वापरला पाहिजे. पाणी पिण्यापुरता, जेवणापुरता मास्क काढला तर आपण समजू शकतो. पण इतर वेळी तरी ठेवला पाहिजे', अशा शब्दांत पवार यांनी कानउघडणी केली.
व्यासपीठावर उपस्थित सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासोबतच्या आठवणी पवार यांनी यावेळी सांगितल्या. एका निवडणुकीत पक्षाने बाळासाहेबांचे तिकिट कापले. त्यावेळी बाळासाहेबांनी बंडखोरी केली. आम्हीही त्यांना हं म्हणत आतून समर्थन दिले. त्या निवडणुकीत बाळासाहेब 43 हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले. परंतु त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची साथ सोडली नाही, हा किस्सा पवार यांनी या भाषणात एेकवला.
बाळासाहेब पाटील यांच्या सह्याद्री कारखान्याकडे 20 लाख पोती साखर शिल्लक आहे. आता साखरेचे दर वाढत आहेत. त्यामुळे ते साखरेचे चांगले पैसे करणार. त्यांचे त्या भागात सहकारावर चांगले वर्चस्व आहे. ते म्हणतील ती पूर्व दिशा, ते ठरवतील ते उमेदवार असे समीकरण तेथे असते. नाही आमच्या माळेगाव कारखान्याची निवडणूक बघा. इथे बाळासाहेब तावरेंचा घाम निघतोय, या शब्दांत अजित पवार यांनी कानपिचक्या दिल्या.