महाड कोर्ट ते मुंबई निवासस्थान, राणेंना रात्रीचे दोन वाजले!
महाड; श्रीकृष्ण द बाळ : सोमवारी सायंकाळी महाड येथील एका हॉटेलमधील पत्रकार परिषदेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर संगमेश्वर येथे नारायण राणेंना पोलिसांनी अटक करून महाड कोर्ट आवारात रात्री नऊ वाजून सेहेचाळीस मिनिटांनी आणले. त्यांना कोर्टासमोर दहा वाजून दहा मिनिटांनी उभे केले. आणि त्यानंतर साडेबारा वाजेपर्यंत सरकारी वकील तसेच ना. राणे यांच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादानंतर महाड कोर्ट यांनी दिलेल्या आदेशानुसार नारायण राणे यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.
रात्री साडेबारा वाजता कोर्टातून राणे आपल्या पत्नी सौ. निलम, चिरंजीव माजी खा. निलेश राणे व सहकाऱ्यांसह बाहेर पडून मुंबईच्या दिशेने रवाना झाले.
कोर्टाच्या आवारातून बाहेर पडल्यावर परिसरात जमा झालेल्या शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी ना. राणेंचा जयजयकार केला. कोर्टासह लगतच्या परिसरात व महाड शहरामध्ये रात्री उशिरापर्यंत पोलिसांची मोठी गस्त लावण्यात आली होती.
बारा वाजून चाळीस मिनिटांनी मुंबई गोवा महामार्गावरील हॉटेल मालवणी येथे ना. राणे भोजनासाठी थांबले होते. या वेळी हॉटेलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राणे यांनी डाळ खिचडी तर बाकीच्या कुटुंबियांनी नियमित शाकाहारी भोजन केल्याचे सांगण्यात आले.
यावेळी राणे यांच्यासमवेत रायगडचे माजी पालकमंत्री विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण, आमदार प्रसाद लाड, माजी आमदार प्रमोद जठार आदी यावेळी उपस्थित होते.
रात्री पावणेदोनच्या सुमारास निघताना नारायण राणे यांनी हॉटेलचे व्यवस्थापक संदीप चोपडे यांची भेट घेऊन उत्कृष्ट पध्दतीचे भोजन दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले. यानंतर पहाटे उशिरा ते आपल्या निवासस्थानी पोहोचल्याची माहिती त्यांच्या नजीकच्या सूत्रांकडून देण्यात आली.

