मुंबई : पुढारी ऑनलाईन; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मानसिक संतुलित बिघडले आहे. त्यामुळे ते बेताल विधान करत आहेत. त्यांची केंद्रीय मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे, अशी माहिती शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिली.
विनायक राऊत म्हणाले की, राणे यांनी थेट प्रसिद्धी माध्यमांनाच धमकी दिली आहे. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे.
त्यांच्यावर रत्नागिरीतील हॉस्पिटलमध्ये उपचाराची गरज आहे. याची गंभीर दखल भाजपने घ्यावी. यासंदर्भात आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे. राणे यांनी शिवसेनेला धमकी देवू नये त्यांचे आणि त्यांच्या चंगू-मंगूचे काहीही चालणार नाही, अशी टीकाही राऊत यांनी केली.
'किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून? अरे, हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती. देशाच्या स्वातंत्र्य दिनाची तुम्हाला माहिती नसावी? सांगा मला, किती चीड येणारी गोष्ट आहे,'अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली होती.
चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या फिर्यादीवरून नाशिक शहर पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.गुन्ह्याचे स्वरूप लक्षात घेता नारायण राणे यांना अटक करून कोर्टासमोर उपस्थित करणे आवश्यक आहे. यासाठी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी पोलीस उपायुक्त संजय बारकंडु यांची नेमणूक केली आहे. त्यांच्या पथकात गुन्हे शाखा युनिट एकच पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांचा समावेश आहे, अशी माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त पांडे यांनी दिली.
हेही वाचलं का?