निलेश, नितेश राणे यांचे शिवसेनेला ‘ओपन चॅलेंज’ | पुढारी

निलेश, नितेश राणे यांचे शिवसेनेला ‘ओपन चॅलेंज’

मुबंई, पुढारी ऑनलाईन:  नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश दिल्यानंतर नितेश राणे आणि निलेश राणे हे दोघे राणेपुत्र आक्रमक झाले आहेत. शिवसेना कार्यकर्त्यांनी आमच्या निवासस्थानासमोर यावेच, आम्ही वाटच बघतोय असे नितेश यांनी तर ‘खऱ्या आईचे दूध प्यायला असाल तर अटक करून दाखवा’ असे आव्हान दिले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत खालच्या पातळीवर जाऊन केलेल्या टीकेमुळे शिवसैनिक आता चांगलेच आक्रमक झाले आहेत.

आक्रमक सेनेला राणे पुत्रांनी ओपन चॅलेंज दिेले आहे.

नितेश राणे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, ‘माझ्या कानावर आलेल्या माहितीनुसार युवासेनेचे कार्यकर्ते आमच्या जुहू येथील निवासस्थानाबाहेर जमणार आहेत.

त्यामुळे एकतर मुंबई पोलिसांनी शिवसैनिकांना रोखावे. नाहीतर पुढे काय घडले तर त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही.

सिंहाच्या हद्दीत पाऊल ठेवायची हिंमत करू नका. आम्हीही तुमची वाट पाहातोय,’

मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात निघालेल्या अटकेच्या आदेशांनंतर राणे समर्थकही आक्रमक झाले आहेत.

एकीकडे नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे यांनी युवासेनेला डिवचल्यानंतर आता माजी खासदार निलेश राणे यांनीही शिवसेनेला थेट आव्हान दिले आहे.

त्यामुळे राणेंवर अटकेची कारवाई झाल्यास भाजपामधील राणे समर्थक आणि शिवसैनिक यांच्यामध्ये जोरदार वाद पेटण्याची शक्यता आहे.

निलेश राणे यांचे आव्हान

निलेश राणे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, कुठेतरी बॅनर लावून आणि मीडियावर हात छाटण्याची वार्ता करत आहेत.

शिवसेनेला वाटत असेल की आम्हाला फरक पडतो तर त्यांनी लक्षात घ्यावं की आम्हाला काडीभर फरक पडत नाही.

खऱ्या आईचं दूध प्यायला असाल तर समोर या आणि दोन हात करा, तुमची औकात दाखवून देऊ.’

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत.

राज्यात ठिकठिकाणी भाजप आणि सेनेचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आले आहेत. त्यामुळे राज्यात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

Back to top button