

नाते; इलियास ढोकले : हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी वसलेल्या बावले गावात जमिनीला भेगा गेल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी रात्री तहसीलदार व डीवायएसपींनी घटनास्थळाची पाहणी करून नागरिकांना धीर दिला. आज प्रांताधिकारी श्रीमती प्रतिमा पुद्दलवाड भूगर्भीय शास्त्रज्ञांसमवेत पाहणी करणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या बावले गावची सुमारे २०० लोकसंख्या आहे. येथील चंद्रकांत महाडिक या शेतकऱ्याला शुक्रवारी सायंकाळी श्रीमती शेवंताबाई कडू यांच्या ओसाड शेतजमिनीमध्ये सुमारे एक किलोमीटर लांबीच्या भेगा पडल्याचे दिसले. त्यांनी याबाबतची माहिती स्थानिक प्रशासनाला दिली. त्यानंतर तहसिलदार सुरेश काशीद, नायब तहसीलदार प्रदिप कुडळ, डिवायएसपी नीलेश तांबे यांनी रात्री अकरा वाजता घटनास्थळाची पाहणी केली. आज भूगर्भीय वैज्ञानिक पाहणी करणार आहेत. भूगर्भीय वैज्ञानिकांच्या अहवालानंतर प्रशासनाकडून ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलविण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.