विरोधी पक्ष नेतेपदासाठी ‘या’ नेत्‍यांची नावे चर्चेत | पुढारी

विरोधी पक्ष नेतेपदासाठी 'या' नेत्‍यांची नावे चर्चेत

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या शिवसेनेकडे पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते अजित पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांच्या नावांची चर्चा सुरु झाली आहे.
शिवसेनेत बंडखोरी झाल्यामुळे आता या पक्षाकडे केवळ 16 आमदार उरले आहेत. ‘शिंदेशाही’ सुरू झाल्यानंतर यातील काही आमदार या गटाच्या गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे संख्याबळ नसतानाही विधान परिषदमध्ये विरोधी पक्षनेते पद देण्याची पद्धत विधानसभेमध्ये अंगीकारली जाणार नाही. विधानसभेत सर्वाधिक आमदार असलेला भाजपा आता सत्तेत गेला असल्यामुळे विरोधकांमध्ये आमदारांची संख्या अधिक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा या पदावर दावा असणार आहे.

राज्यातील इतर पक्षांच्या तुलनेत राष्ट्रवादीकडे सर्वाधिक अनुभवी नेते आहेत. राजकारणाचा दीर्घ अनुभव, प्रशासनाकडून कामे करून घेण्याची अनोखी पद्धत, पक्षातील आमदारांसह इतर इतर पक्षातील आमदारांना ही सभागृहाच्या कामकाजात सक्रिय करण्याचे कसब अजित पवार यांच्याकडे आहे. तसेच अनेक सामाजिक आणि राजकीय मुद्यांवर परखड मत मांडणारे अशी अजित पवार यांची ओळख आहे. त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नावाचा ही विरोधीपक्ष नेतेपदासाठी विचार होत आहे.

प्रतिस्पर्ध्याला कुशलतेने चिमटे काढणे , राजकीय टोमणे मारणे त्याचबरोबर राजकीय अनुभवातून संदर्भ असून विषय पटवून देण्यात पाटील यांचा हातखंडा आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मर्जीतले नेते म्हणूनही जयंत पाटील यांची ओळख आहे. धनंजय मुंडे यांना विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते पदाचा अनुभव गाठीशी आहे. भाजपातल्या अनेक कुरघोड्या त्यांनीं आधी पाहिला आहेत. राष्ट्रवादीतील तरुण आणि फायर ब्रँड नेते म्हणून आहे. मुंडे यांना ओळखले जाते.

विरोधी पक्ष नेते पदासंदर्भात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले की, महाविकास आघाडी म्हणून आम्ही तीन पक्ष एकत्र होतो. यापुढेही विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी आमचा एकच उमेदवार असणार आहे. सरकार गेल्यानंतर आम्ही एकत्र बसून चर्चा केलेली नाही. मात्र पुढील काळात एकत्र बसून पुढील धोरण ठरवू. स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीत जेथे – जेथे शक्य होईल, तेथे तीनही पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न यशस्वी करु, असेही त्यांनी म्हटले.

Back to top button