

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा कोरोनानंतर प्रथमच दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त आषाढी यात्रा भरत आहे. 10 जुलै रोजी साजर्या होणार्या यात्रेसाठी प्रशासन कामाला लागले आहे. पालखीमार्गांतील अडचणी दूर करणे, अतिक्रमण काढणे याचबरोबर ज्याठिकाणी पालख्या, दिंड्या विसावणार आहेत त्या 65 एकर येथील भक्तीसागर येथे भाविकांना मोफत देण्यात येणार्या प्लॉटचे नियोजन, स्वच्छतागृहांची स्वच्छता, जागेची साफसफाई, खांबावरील विजचे दुरुस्ती आदी कामे करण्यात येत आहेत.
आषाढी यात्रेत पावसाळ्याचे दिवस असतात. त्याअनुषंगाने प्रशासनाकडून भाविकानां सेवासुविधा पुरवण्याचा प्रयत्न केला जातो. मानाच्या पालख्या सोडल्या तर उर्वरित सर्वच पालख्या, दिंड्या यांचा मुक्काम शहराबाहेर 65 एकर येथील भक्तीसागर येथे असतो. याठिकाणी प्रशासनाकडून पालख्या, दिंड्यांना निवारा करण्यासाठी मोफत प्लॉट देण्यात येत आहेत. मोफत वीज, पिण्याचे पाणी, आरोग्यसेवा, पोलिस संरक्षण, गॅस व रॉकेलही पुरवण्यात येते. त्याअनुषंगाने प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आलेली आहे. 65 एकर येथे सध्या गवत, काटेरी झुडुपे काढून साफसफाई करण्यात येत आहे. याकरिता येथे नगरपालिकेचे कर्मचारी राबत आहेत.
जंतनाशक फवारणीसह मॅलेथॉन पावडर, ब्लिचिंग पावडर वेळोवेळी टाकण्यात येत आहे. येथे कायमस्वरुपी शौचालये आहेत. तरीदेखील भाविकांची गरज लक्षात घेऊन तात्पुरती शौचालये उभारण्यात येणार आहेत.आवश्यकतेनुसार त्यात वाढ करण्यात येणार असून तात्पुरत्या शौचालयांच्या ठिकाणी पाण्याच्या टिपा ठेऊन त्यामध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. वारकरी व भाविकांनी उघड्यावर शौच विधी करू नये म्हणून प्रतिबंधक पथकांची नेमणूकदेखील करण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी माळी यांनी दिली.