…अन् पुरावा म्हणून पोलिसांनी नेलेला बॉम्ब कोर्टातच फुटला | पुढारी

...अन् पुरावा म्हणून पोलिसांनी नेलेला बॉम्ब कोर्टातच फुटला

पाटणा : वृत्तसंस्था

बिहारची राजधानी पाटण्याच्या एका न्यायालयात पोलिसांनी पुरावा म्हणून नेलेला बॉम्ब सुनावणी सुरू असतानाच फुटला अन् सर्वत्र एकच हाहाकार उडाला. शुक्रवारी घडलेल्या या घटनेत एक पोलिस कर्मचारी जखमी झाला. दिवाणी न्यायालयात दुपारच्या सुमारास ही आश्‍चर्यकारक घटना घडली. कदमकुआं ठाण्याच्या पोलिसांनी शहरातील पटेल हॉस्टेलमधून एक बॉम्ब काही दिवसांपूर्वी जप्‍त केला होता. तो त्यांनी निष्प्रभ न करता पोलिस ठाण्यातच ठेवला होता.

या प्रकरणाची शुक्रवारी न्यायालयात सुनावणी होणार होती. त्यामुळे पोलिस थेट तो बॉम्ब घेऊनच न्यायालयात पोहोचले. सुनावणीपूर्वी एक उपनिरीक्षक बॉम्बला टेबलावर ठेवून काही कागदपत्रे तपासत होते. त्याचवेळी स्फोट झाला. पाटण्याचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक मानवजितसिंह ढिल्‍लन म्हणाले की, पोलिस कर्मचारी मदत सिंह हे या घटनेत किरकोळ जखमी झाले. त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

क्षीण स्फोट

पोलिसांनी आणलेल्या बॉम्बची क्षमता कमी होती, त्यामुळे जवळ उभे असलेले एक कर्मचारी जखमी झाले. मोठा स्फोट झाला असता, तर कित्येकांचा नाहक जीव गेला असता. आता हा जिवंत बॉम्ब न्यायालयात नेण्याचा आदेश कोणी दिला होता, बॉम्बची तपासणी विशेष पथकाकडून करण्यात आली होती का, बॉम्बमध्ये कोणत्या वस्तू वापरण्यात आल्या होत्या, याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Back to top button