पीओपी मूर्ती उत्पादनावर केंद्राने घातली बंदी | पुढारी

पीओपी मूर्ती उत्पादनावर केंद्राने घातली बंदी

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने पीओपी मूर्तींवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार शहरात महापालिकेच्या माध्यमातून कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांनी दिली. घोलप यांनी सांगितले की, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार शहरात मनपा आयुक्तांच्या मार्गदर्शननुसार माझी वसुंधरा अभियान व राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असुन शहर स्तरावर पंचमहाभूतांचे संवर्धनाचे काम प्रगतीपथावर आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुर्ती विसर्जन करण्याबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या असून त्यामध्ये पीओपी मुर्ती उत्पादनावर बंदी घालण्यात आली आहे. याबाबत मार्गदर्शक तत्वांची स्थानिक स्वराज्य संस्थेला अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे.
या अनुषंगाने मनपात उपायुक्त घोलप यांच्या अध्यक्षतेखाली मुर्ती उत्पादक व विक्रेत्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीत पर्यावरण अधिकारी स्वप्नील सोलनकर यांनी मार्गदर्शक सूचनांची सर्वांना माहिती दिली.

घोलप यांनी पीओपी बंदीचे काटेकोर पालन करण्याबाबत सूचना देत पर्यावरणपुरक मुर्ती उत्पादन व विक्रीवर जास्तीत जास्त भर द्यावा, असे आवाहन उत्पादकांना केले मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष अमरनाथ यांनी याबाबत प्रशासनाला पुर्ण सहकार्य करून पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे आश्वासन दिले. बैठकीस चंद्रकांत वग्गा, गणेश बडगू, मौलाली शेख, संतोष गालपल्ली आदी उपस्थित होते.

हेही वाचलंत का?

Back to top button