नागपूर; पुढारी ऑनलाईन : काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे (Prakash Amte) यांना रक्ताचा कर्करोग झाल्याची बातमी समोर आली होती. या बातमीनंतर डॉ. प्रकाश आमटे यांची संपूर्ण महाराष्ट्रालाच चिंता लागून राहिली होती. याच पार्श्वभूमीवर त्यांचे चिरंजीव अनिकेत आमटे यांनी आता डॉ. प्रकाश आमटे यांची प्रकृती स्थिर व चांगली असल्याची माहिती फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे. अजून काही दिवस पुण्यातील रुग्णालयातच त्यांच्यावर उपचार केले जातील, असे त्यांनी पोस्टद्वारे सांगितले आहे.
काही दिवसांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा प्रकल्पाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश आमटे (Prakash Amte) हे पुण्यामध्ये एका कार्यक्रमानिमित्त आले होते. यावेळी त्यांना निमोनियाचा त्रास जाणवल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्यांच्या काही वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या होत्या. या तपासणीत त्यांना हेअर सेल ल्युकोमॅनिया अर्थात रक्ताचा कर्करोग असल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर त्यांच्यावर निमोनियावरील उपचार सुरु करण्यात आले होते. या माहितीमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांमध्ये प्रकाश आमटे यांची चिंता व काळजी वाटू लागली होती.
डॉ. प्रकाश आमटे (Prakash Amte) यांच्या तब्बेतीत सुधारणेबाबतची पोस्ट त्यांचे पुत्र अनिकेत आमटे यांनी फेसबुकद्वारे केली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये बाबांची तब्बेत आता बरी आहे. तसेच त्यांना रुग्णालायतून सोडण्यात येईल, असे सांगितले आहे. तसेच आणखी दोन – तीन दिवसांनी त्यांच्या काही तपासण्या करुन त्यांच्यावर केमो थेरपीचे उपचार सुरु करण्यात येणार असल्याची माहिती अनिकेत आमटे यांनी दिली आहे. आणखी महिनाभर प्रकाश आमटे यांच्यावर कॅन्सरवरील उपचार हे पुण्यात होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.