सांगली : महाविकास आघाडी हे बहुजनांचे सरकार हा फसवा दावा; गोपीचंद पडळकर | पुढारी

सांगली : महाविकास आघाडी हे बहुजनांचे सरकार हा फसवा दावा; गोपीचंद पडळकर

आटपाडी (सांगली ), पुढारी वृत्तसेवा : ‘महाविकास आघाडी सरकार हे बहुजनांचं सरकार आहे’ असा भयानक फसवा दावा खासदार संजय राऊत यांनी पुण्यातल्या सभेत केल्याची टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. बहुजनांचे हित कुठे आहे आणि कशात आहे? हे तुम्हाला रोज सकाळी शीर्षासन केल्यावर सुद्धा तुमच्या मेंदूत शिरणार नाही. कारण त्याकरिता स्वाभिमान असावा लागतो, असा टोलाही पडळकर यांनी राऊत यांना लगावला. बहुजनांचे सरकार म्हणणाऱ्या खा. राऊत यांना कदाचित आम्हा बहुजनांना आपणही आपल्यासारखेच शकुनी काकाचा हुजऱ्या समजत असाल, असे म्हणत अनेक सवाल पडळकर यांनी उपस्थित केले.

पडळकर म्हणाले, तुमच्या प्रस्थापितांच्या सरकारमध्ये १३५ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या ते बहुजन नव्हते का? गेल्या दोन वर्षात एक हजाराच्यावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, ते बहुजन नव्हते का? शेतात पीकं असताना शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसून वीज तोडणी केली, ते शेतकरी बहुजन नाहीत का? आघाडी सरकारमधील प्रस्थापित नेत्यांच्या अडेलतट्टू धोरणामुळं एसी, एसटी ,भटके विमुक्त कर्मचाऱ्यांचं पदोन्नतीमधील आरक्षण मातीत घालवलं गेलं, ते कोणत्या तुमच्या बहुजन प्रेमातून आलं होतं? धनगर आरक्षणासंबंधी एक साधी बैठकही तुम्ही अडीच वर्षात करू शकला नाहीत. हे तुमचं कोणतं बहुजन धोरणं होतं?

सरकार स्थापनेच्या वेळेस तुम्ही प्रस्थापितांसोबत सुप्रीम कोर्टाच्या दिल्ली वाऱ्या करून तातडीने सरकार स्थापनेचा निर्णय घेतला. पण जेव्हा बहुजनांच्या राजकीय आरक्षणाची वेळ येते, त्यावेळेस सुप्रीम कोर्टाचे तीन तीन निर्णय आमच्या विरोधात येतात. कारण कोर्टानं सांगून सुद्धा तुम्ही अडीच वर्षापासून साधा इंपिरिकल डेटाही तयार केला नव्हता. तुमची इच्छा हीच आहे की बहुजन पोरांनी तुमच्या सारख्याच प्रस्थापितांच्या सतरंज्याच उचलायच्या.

बहुजनांचं दैवत असलेल्या श्री विठ्ठलाच्या वारीतून तुम्ही वारकऱ्यांच्या खांद्यावरून भगवा पताका उतरवता. हे बहुजन समाज विसरलेला नाही. आपल्या बहुजन समाजाच्या हक्काचा गळा घोटणाऱ्या लबांडाचा तुम्ही रोज सकाळी उठून उधो उधो करता. हे बहुजनांचे हीत कुठे आहे आणि कशात आहे हे तुम्हाला रोज शीर्षासन केल्यावर सुद्धा कळणार नाही. कारण त्या करिता स्वाभिमान असावा लागतो असा टोला पडळकर यांनी खा.राऊत यांना लगावला.

व्हिडिओ पाहा :  आणि त्या दिवशी महाराष्ट्र शोकसागरात बुडाला | Last Day of Ch.Shahu maharaj

 

Back to top button