नवी दिल्ली, २१ मार्च, पुढारी वृत्तसेवा : पहिल्या, दुसऱ्या आणि तिसरा कोरोना लाटेचा तडाखा सहन केल्यानंतर हळूहळू भारताची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरू आहे. पंरतु, अद्यापही कोरोनाचा धोका पुर्णत: टळलेला नसल्याने सतर्कता बाळगण्याचा इशारा केंद्राकडून सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आला आहे. रविवार देशभरात केवळ १ हजार ५४९ कोरोनाबाधितांची भर पडली. तर, ३१ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. दरम्यान, २ हजार ६५२ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. सोमवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.७४ टक्के नोंदवण्यात आला.
देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ४ कोटी ३० लाख ९ हजार ३९० पर्यंत पोहचली आहे. यातील ४ कोटी २४ लाख ६७ हजार ७७४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, २५ हजार १०६ रुग्णांवर (०.०६%) उपचार सुरू आहेत. दुदैवाने आतापर्यंत ५ लाख १६ हजार ५१० रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. सोमवारी देशाचा आठवड्याचा तसेच दैनंदिन कोरोनासंसर्गदर ०.४० टक्के नोंदवण्यात आला.
देशात कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १८१ कोटी २४ लाख डोस देण्यात आले आहेत. ९७ कोटींहून अधिक नागरिकांना कोरोनाचा पहिला तर, ८२ कोटींहून अधिक नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. १२ ते १४ वयोगटातील मुलांना १८ लाख, १५ ते १७ वयोगटातील मुलांना ९ कोटी १७ लाखांहून अधिक डोस देण्यात आले आहेत. केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १८३ कोटी ५२ लाख २५ हजार ६० डोस पैकी १७ कोटी २१ लाख २५६ डोस अद्यापही केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांकडे शिल्लक असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात आतापर्यंत ७८ कोटी ३० लाख ४५ हजार १५७ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील ३ लाख ८४ हजार ४९९ तपासण्या रविवारी दिवसभरात करण्यात आल्या आहेत.
श्रेणी बूस्टर डोस
१) आरोग्य कर्मचारी : ४३,५९,७२२
२) फ्रंटलाईन वर्कर्स : ६६,६६,४९४
३) ६० वर्षांहून अधिक : १,०७,२२,८१९