पिंपरी : धारधार शस्त्राने वार करून तरुणाचा खून  | पुढारी

पिंपरी : धारधार शस्त्राने वार करून तरुणाचा खून 

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी : धारदार शस्त्राने वार करून अज्ञात इसमांनी एका तरुणाचा निर्घृण खून केला. ही घटना सोमवारी (दि. २६) सकाळी भोसरी येथील विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिराजवळ उघडकीस आली.

अमन सुरेश डांगळे (२७, रा. देवकरवस्ती, चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याची पत्नी सोनाली अमन डांगळे (वय २५) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती अमन डांगळे हे तंबाखूची पुडी घेऊन येतो. असे सांगून रात्री अकराच्या सुमारास घराबाहेर पडले होते.

ते परत आले नाहीत म्हणून त्याच्या पत्नीने रात्री बारा वाजता त्यांना फोन केला. त्यावेळी दहा मिनिटांमध्ये येतो, असे सांगून अमन यांनी घाई गडबडीत फोन कट केला.

मात्र, त्यानंतरही बराच वेळ उलटनही अमन घरी न परतल्याने त्यांच्या पत्नीने पुन्हा चार ते पाच वेळा मोबाईलवर फोन केला. मात्र, अमन यांनी फोन उचलला नाही.

मध्यरात्री सव्वा एक ते पाचच्या दरम्यान अज्ञात इसमांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. आरोपींनी अमन यांच्या डोक्‍यावर, पाठीवर आणि हातावर धारदार शस्त्राने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. यामध्ये अमन यांच्या उजव्या हाताची बोटेही छाटली गेली.

शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने अमन यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांनी पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

घटनेची माहिती मिळताच भोसरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

घटनस्थळावरून पोलिसांनी अमन यांची पल्सर दुचाकी आणि चप्पल जप्त केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

हे ही वाचलं का? 

Back to top button