हिंगणघाट प्राध्‍यापिका जळीतकांड : आरोपी विकेश नगराळेला मरेपर्यंत जन्‍मठेप

file photo
file photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : हिंगणघाट प्राध्‍यापिका जळीतकांड प्रकरणी न्‍यायालयाने आज आरोपी विकेश नगराळे याला मरेपर्यंत जन्‍मठेपेची शिक्षा सुनावली. विकेश नगराळे याला हिंगणघाट जिल्‍हा आणि अतिरिक्‍त सत्र  न्‍यायालयाने  बुधवारी दोषी ठरवले होते. नगराळे हा गेली दाेन वर्ष कारागृहात आहे. मात्र शिक्षा भाेगताना हा कालावधी गृहीत धरला जाणार नाही, असेही न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले आहे, अशी माहिती सरकारी वकील उज्‍ज्‍वल निकम यांनी दिली.

'गुन्‍हा दुर्मिळातील दुर्मिळ नसल्‍याने फाशी नाही'

आराेपी विकेश नगराळे याला फाशीची शिक्षा ठाेठवावी, अशी मागणी आम्‍ही न्‍यायालयाकडे केली हाेती. मात्र हा गुन्‍हा दुर्मिळातील दुर्मिळ नाही त्‍यामुळे याला फाशी देता येणार नाही, असे न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केल्‍याचेही निकम यांनी यावेळी सांगितले.

हिंगणघाट येथे विकेश नगराळे याने २२ वर्षीय प्राध्‍यापिकेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले होते. या घटनेत पीडित प्राध्‍यापिका  गंभीररित्या भाजली. ७ दिवस तिने मृत्‍यूशी झूंज दिली. यानंतर तिची प्राणज्‍योत मालवली. या घटनेनंतर हिंगणघाट तसेच राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. प्राध्‍यापिकेवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या विकेश उर्फ विक्की नगराळे या नराधमाने हे घृणास्पद कृत्य केले होते. हिंगणघाट जिल्‍हा आणि अतिरिक्‍त सत्र  न्‍यायालयाने आरोपी विकेश नगराळे याला  ५ हजारांचा दंड व मरेपर्यंत जन्‍मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

'त्या' दिवशी काय घडले होते?

 प्राध्‍यापिका ३ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी घराबाहेर पडली होती. विकेश नगराळे  तिच्या घराबाहेरच दबा धरून बसला होता.  प्राध्‍यापिका वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील नंदेरी चौकात आली. यावेळी नगराळे याने तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले. यामध्ये पीडिता ४० टक्के भाजली होती. तिच्यावर नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते; पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता.

 पीडितेला स्‍मृतीदिनी न्‍याय मिळाला…

विकेश उर्फ विक्की नगराळे या नराधमाने ३ फेब्रुवारी २०२० रोजी प्राध्‍यापिकेला पेटवून दिले हाेते. या धक्‍कादायक प्रकाराने संपूर्ण राज्‍य हादरले.  यानंतर पीडित प्राध्‍यापिकेची सात दिवस मृत्‍यूशी झूंज सुरु हाेती. अखेर १० फेब्रुवारी २०२० राेजी उपचार सुरु असताना तिने अखेरचा श्‍वास घेतला. दाेन वर्षांनी आज १० फेब्रुवारी राेजीच हिंगणघाट जिल्‍हा आणि अतिरिक्‍त सत्र  न्‍यायालयाने दाेषी  विकेश उर्फ विक्की नगराळे याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठाेठावली. पीडितेला स्‍मृतीदिनी न्‍याय मिळाला, अशी चर्चा न्‍यायालयीन परिसरात सुरु हाेती.

हेही वाचलं का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news